सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहीतेची आत्महत्या ; चिंचवडमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2020 08:17 PM2020-02-09T20:17:02+5:302020-02-09T20:18:23+5:30

सासरच्यांकडून हाेणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षीत विवाहीतेने पाचव्या मजल्यावरुन उडी मारत आत्महत्या केली आहे.

suicide of married women due to harassment from husband and his family | सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहीतेची आत्महत्या ; चिंचवडमधील घटना

सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहीतेची आत्महत्या ; चिंचवडमधील घटना

Next

चिंचवड: कौटुंबिक त्रासाला कंटाळून सततच्या होणाऱ्या चिडचिडीनं तिला जगणं नकोसं वाटू लागलं. तीन वर्षांच्या बाळाला पोरकं करत तिने आपली जीवनयात्रा संपविली. उच्चशिक्षित असणाऱ्या या पस्तिशीच्या तरुणीनं अगदी टोकाचं पाऊल उचललं आणि इमारतीच्या पाचव्या मजल्या वरून थेट उडी घेत संसाराच्या या गाड्याला अखेरचा निरोप दिला. आईच्या विश्वात रमलेल्या पोटच्या गोळ्याला असं पोरकं करून गेलेल्या मातेला पाझर का फुटला नसावा या चर्चेनं अवघं चिंचवड हळहळलं.

चिंचवड मधील माणिक कॉलनीत राहणाऱ्या मेघा संतोष पाटील (३४) या तरुणीने आपल्या इमारतीच्या पाचव्या मजल्या वरून खाली उडी घेत शनिवारी सायंकाळी आपली जीवनयात्रा संपविली. चिंचवड पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार मेघा यांना घरात पती, सासू व सासरे वारंवार शारीरिक व मानसिक त्रास देत होते. घालून,पाडून बोलणे व फ्लॅट घेण्यासाठी वडिलांकडून पंचवीस लाख रुपये आणण्याची मागणी करीत होते. यामुळे त्यांच्या घरात वारंवार वाद होत होते. या वादाला कंटाळून मेघा यांनी शनिवारी आत्महत्या केली. याबाबत मेघा यांचे वडील सुधाकर शंकर शिंदे रा.इचलकरंजी यांनी मेघा यांचे पती डॉ. संतोष नामदेव पाटील,नामदेव पाटील (सासरे),सुजाता पाटील (सासु) यांच्या विरोधात आत्महत्तेस प्रवृत्त केल्या बाबत गुन्हा दाखल केला आहे. पाच वर्षांपूर्वी मेघा व संतोष यांचा विवाह झाला होता.

मेघा या उच्चशिक्षित असून आयटी कंपनीत कामाला होत्या तर त्यांचे पती संतोष हे डॉक्टर आहेत. मागील दीड वर्षांपासून ते माणिक कॉलनीतील फ्लॅट मध्ये रहात होते. पती,सासू व सासरे वारंवार शारीरिक व मानसिक त्रास देत असल्याचे त्यांनी आपल्या घरच्यांना कळविले होते. त्यांना एक तीन वर्षांचा मुलगा आहे.पाच तारखेला त्याचा वाढदिवस त्यांनी थाटामाटात साजरा केला होता. आत्महत्या करण्याआधी घरात त्यांचे वाद झाले होते. डॉ.संतोष व सासू,सासरे घरात होते.पोटच्या गोळ्याला नजरेआड करत त्यांनी थेट घराच्या ग्यालारीतून खाली उडी मारत आत्महत्या केली. त्यांना उपचारासाठी यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचाराआधीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. मेघा यांच्या जाण्याने चिंचवड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नेहमी हसतमुख असणाऱ्या मेघा यांच्या जाण्याने परिसरात शोककळा पसरली आहे. चिंचवड पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Web Title: suicide of married women due to harassment from husband and his family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.