Pimpri Chinchwad: 'मी खूप त्रासलो आहे', सासरच्या छळाला कंटाळून जावयाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 07:09 PM2022-02-23T19:09:21+5:302022-02-23T19:09:38+5:30
पत्नी, सासू, मेव्हणा, मेव्हणी आणि तिच्या पतीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे चिठ्ठीत नमूद
पिंपरी : सासरच्या त्रासाला कंटाळून जावयाने आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना मिळून आली. सुतारवस्ती माण हिंजवडी येथे ऑक्टोबर २०२१ पासून ८ जानेवारी २०२२ या कालावधीत ही घटना घडली. गणेश नागनाथ चव्हाण, असे आत्महत्या केलेल्या जावयाचे नाव आहे.
गणेशचे वडील नागनाथ भाऊराव चव्हाण (वय ५०, रा. निचपूर, ता. किनवट, जि. नांदेड) यांनी याप्रकरणी बुधवारी (दि. २३) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, रोशनी गणेश चव्हाण (वय २४,) वनिता मोहन पवार (वय ४५, रा. पालाईगुडा, पो. गोंडवडसा, ता. माहुर, जि. नांदेड), रुपाली आलोक राठोड (वय २०, रा. मुंबई), आलोक दशरथ राठोड (वय २८, रा. मुंबई), रितेश मोहन पवार (वय १९, रा. पालाईगुडा, पो. गोंडवडसा, ता. माहुर, जि. नांदेड) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा मुलगा गणेश याचा आणि आरोपी रोशनी हिचा २०१३ मध्ये विवाह झाला. गणेश आणि रोशनी त्यांच्या दोन मुलांसह सुतारवस्ती, माण, हिंजवडी येथे राहत होते. गणेश पुणे येथे सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. रोशनीची आई वनिता पवार हिने गणेशकडून एक लाख ३० हजार रुपये घेतले होते. गणेश याने ते पैसे परत मागितले असता तिने रोशनीला गणेशच्या विरोधात भडकावले. त्यामुळे रोशनीने गणेश सोबत भांडण केले. रोशनी दोन्ही मुलांना घेऊन मुंबईला तिची आई आणि बहीण यांच्याकडे निघून गेली. आरोपींनी रोशनी आणि तिच्या मुलांना गणेशपासून लपवून ठेवले. दोन्ही मुलांना गणेश सोबत बोलू दिले नाही.
नातेवाईकांच्या ताब्यात दिला नाही मृतदेह
गणेशचा मृतदेह शविच्छेदनासाठी नेला असता कोरोना तपासणी करण्यात आली. त्याचा अहवाल कोरोना ‘पॉझिटिव्ह’ आला. त्यामुळे गणेशचा मृतदेह नातेवाईकांकडे देण्यात आला नाही.
आत्महत्येपूर्वी लिहिली चिठ्ठी
गणेशने ८ जानेवारी २०२२ रोजी त्याचा भाऊ दिनेशला फोन केला. मी खूप त्रासलो आहे. मला त्रास सहन होत नाही. तुझ्याशी माझं शेवटचं बोलणं आहे, असे गणेशने दिनेशला सांगितले. त्यानंतर दिनेशने त्याच्या मित्राला गणेशच्या घरी पाठवले. मित्र गणेशच्या घरी गेला. मात्र तोपर्यंत गणेशने गळफास घेतला होता. गणेशने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. पत्नी, सासू, मेव्हणा, मेव्हणी आणि तिच्या पतीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे चिठ्ठीत नमूद आहे.