लग्नास स्पष्ट होकार अथवा नकार न दिल्याने तरुणाची आत्महत्या; हिंजवडीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 11:32 AM2021-06-10T11:32:54+5:302021-06-10T12:43:39+5:30
आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाने मोबाईलमध्ये ऑडिओ रेकॉर्ड केला. त्या रेकॉर्डिंगमध्ये आरोपी व आत्महत्येच्या कारणाचा उल्लेख केला आहे...
पिंपरी : लग्नास स्पष्ट होकार अथवा नकार दिला नाही. या कारणावरून तरुणाने मोबाईल फोनमध्ये ऑडिओ रेकॉर्डिंग करून आत्महत्या केली. हॉटेल रॉयल, येळवंडे वस्ती, हिंजवडी येथे २४ एप्रिलला सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.
लता पंजाब खराडे (वय ४७, रा. काळाखडक, वाकड) यांनी याप्रकरणी बुधवारी (दि. ९) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. गणेश विक्रम खराडे (वय ३२), उमेश विक्रम खराडे (वय ३४, दोघे रा. मारुंजी), तुकाराम खंडू उदमले (वय ५१, रा. चोंढी, ता. जामखेड, जि. अहमदनगर), अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा तसेच आरोपी तुकाराम उदमले यांची मुलगी यांचे लग्न करण्याबाबत चर्चा होती. तुकाराम यांनी त्यांची मुलगी फिर्यादी यांच्या मुलाला देऊ नये म्हणून आरोपी गणेश आणि उमेश या दोघांनी फिर्यादी यांचा मुलगा व्यसनी आहे. त्याची संगत चांगल्या मुलासोबत नाही. तो फालतू आहे, असे सांगून आरोपी तुकाराम यांची दिशाभूल केली. तुकाराम यांनी कोणत्याही प्रकारची खातरजमा न करता आरोपी गणेश व उमेश यांचे ऐकून लग्नास स्पष्ट होकार अथवा नकार दिला नाही. फिर्यादी यांना फक्त आशेवर ठेवले. याच कारणावरून फिर्यादी यांच्या मुलाने २४ एप्रिलला सायंकाळी साडेपाचच्या सुमारास रॉयल हॉटेल येथे आत्महत्या केली.
आत्महत्या करण्यापूर्वी फिर्यादी यांच्या मुलाने मोबाईलमध्ये ऑडिओ रेकॉर्ड केला. त्या रेकॉर्डिंगमध्ये आरोपी व आत्महत्येच्या कारणाचा उल्लेख केला आहे. त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक छाया बोरकर तपास करीत आहेत.