पवनामाईच्या स्वच्छतेसाठीच रविवार, संघटनांचा पुढाकार, रावेतपासून दापोडीपर्यंत मोहीम, जलपर्णीचे करणार समूळ उच्चाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 03:42 AM2017-11-28T03:42:08+5:302017-11-28T03:42:42+5:30
रोटरी क्लब वाल्हेकरवाडी आणि विविध सामाजिक संघटनांनी एकत्रित येऊन ‘माझी पवनामाई स्वच्छ सुंदर पवनामाई’ हा उपक्रम हाती घेऊन त्याची सुरुवात रावेत येथील नदीपात्रापासून केली.
रावेत : रोटरी क्लब वाल्हेकरवाडी आणि विविध सामाजिक संघटनांनी एकत्रित येऊन ‘माझी पवनामाई स्वच्छ सुंदर पवनामाई’ हा उपक्रम हाती घेऊन त्याची सुरुवात रावेत येथील नदीपात्रापासून केली. रोटरी क्लब आॅफ वाल्हेकरवाडी, जलमैत्री अभियान, भावसार व्हिजन इंडिया, शेखर चिंचवडे युथ फाउंडेशन, मोरेश्वर भोंडवे तरुण मित्र मंडळ या संस्थांच्या माध्यमातून वाल्हेकरवाडी येथील पवना नदीवर स्वच्छ सुंदर पवना नदी ही मोहीम रावेत ते दापोडी या २४ किलोमीटर पट्ट्यात टप्प्याटप्प्याने राबविण्यात
येणार आहे.
याच मोहिमेंतर्गत ही जलपर्णी काढण्यात आली. पवना नदी संवर्धनासाठी उपाययोजना या मोहिमेचा शुभारंभ पवना नदीपात्रात करण्यात आला होता. पहिल्या टप्प्यात वाल्हेकरवाडीमधील सर्व नाल्यांची सफाई आणि त्यावर प्रक्रिया हा टप्पा पूर्ण करण्यात आली. त्यानंतर जाधव घाटावर असणारी सर्व जलपर्णी पूर्णपणे काढण्यात आली़ वाल्हेकरवाडी पवना घाटावर जाऊन जलशुद्धीकरण आणि जलपर्णी यावर काय उपाययोजना करता येतील याची चर्चा नागरिकांसमवेत करण्यात आली होती.
नगरसेवक सचिन चिंचवडे, वाल्हेकरवाडी प्रभागाच्या नगरसेविका करुणा चिंचवडे, राष्ट्रवादीचे नगरसेवक व स्थायी समिती सदस्य मोरेश्वर भोंडवे, पर्यावरण विभागप्रमुख संजय कुलकर्णी, वाल्हेकरवाडी रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर, शेखर चिंचवडे युथ फाउंडेशनचे अध्यक्ष शेखर चिंचवडे, मारुती उत्तेकर, सोमनाथ हरपुडे, सचिन काळभोर, जगन्नाथ फडतरे सहभागी झाले. या वेळी जलदिंडीचे राजीव भावसार, आर्ट आॅफ लिव्हिंगचे संदीप पवार, इंद्रायणी नदी स्वछता अभियानचे देहू येथे सोप्या पद्धतीने जलपर्णी काढणारे सोमनाथ मुसुडगे तसेच पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत यांनी मार्गदर्शन केले.
या वेळी भावसार व्हिजनचे राजीव भावसार, रोटरी क्लब आॅफ वाल्हेकरवाडीचे प्रदीप वाल्हेकर, नदी संवर्धन मोहिमेत गेली अनेक वर्षे काम करणारे सोमनाथ मसुडगे, सुभाष वाल्हेकर, सोमनाथ हरपुडे, युवराज वाल्हेकर, चिंतामणी सोंडकर, सचिन काळभोर, सचिन शिवले उपस्थित होते.
प्रत्येक रविवार
हा नदी संवर्धनासाठी
४दर रविवार हा नदी संवर्धनासाठी देणार असल्याचे नागरिकांनी या वेळी सांगितले. नदीपात्रातून २ ट्रक इतकी जलपर्णी काढण्यात आली. जलपर्णी जमा होण्यासाठी वालरोप बांधण्यात आले होते. त्यावरील साचलेली जलपर्णी काढण्यात आली. हा वालरोप गरवारे वालरोप कंपनीकडून पुरविण्यात आला होता. लोकसहभागातून नदी संवर्धन उपक्रम नागरिकांनी हाती घेतला असताना पालिकेच्या ना पर्यावरण विभागाचे, ना आरोग्य विभागाचे कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले़ या बाबत नागरिकांनी पर्यावरण विभागप्रमुखांकडे खंत व्यक्त केली.
पवना नदीमध्ये सातत्याने जलपर्णीचा भेडसावणारा प्रश्न कायम स्वरूपी सोडविण्याचा प्रयत्न होत असताना पालिका प्रशासनाने येथे आवश्यक त्याबाबी पुरविणे गरजेचे आहे. याकडे मात्र डोळेझाक केलेली आहे़ या माध्यमातून पालिकेचे जलपर्णी काढण्यासाठी होणारा लाखो रुपयांचा खर्च वाचत असताना येथे बोट उपलब्ध करून दिली असती तर अधिक जोमाने कामाला गती मिळाली असती़ पुढील टप्प्यातील कामाच्या वेळी प्रशासनाने सुविधा उपलब्ध करून दिली नाही. तर शहराला येथून होणारा पाणीपुरवठा बंद केला जाईल.
- मोरेश्वर भोंडवे, नगरसेवक
पवनामाईच्या संवर्धनासाठी हाती घेतलेल्या उपक्रमात सातत्य ठेवून पूर्णत्वाकडे घेऊन जाण्यास पालिकेच्या माध्यमातून आवश्यक ती मदत केली जाईल. या उपक्रमामुळे रावेत, वाल्हेकरवाडी परिसराला भेडसावणारी आरोग्याची समस्या कमी होण्यास मदत होईल. - सचिन चिंचवडे,
ब प्रभाग अध्यक्ष
‘माझी पवनामाई स्वच्छ पवनामाई’ या उपक्रमांतर्गत रावेत ते दापोडी हा २४ किलोमीटरचे नदी पात्र टप्प्याटप्प्याने दोन महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आह़े सध्या जलपर्णी वाढण्यासाठी पोषक वातावरण असते़ याच काळात वाढणारी जलपर्णी रोखली तर पुढे जलपर्णी वाढणार नाही व नदी सतत स्वच्छ राहण्यास मदत होईल.
- प्रदीप वाल्हेकर, अध्यक्ष रोटरी क्लब, वाल्हेकरवाडी
रावेत ते दापोडी २४ किमी पट्ट्यात मोहीम
जलपर्णी बांधण्यासाठी वॉलरोपचा वापर
नागरिकांसमवेत चर्चा
करुन उपाययोजना