कागदी पिशव्यांच्या निर्मितीतून पिंपरीत पर्यावरणाला हातभार; शेखर चिंचवडे युथ फाउंडेशनचा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 04:26 PM2018-02-12T16:26:34+5:302018-02-12T16:29:50+5:30
चिंचवडे नगर येथील शेखर चिंचवडे युथ फाउंडेशनच्या वतीने महिलांसाठी स्वयं रोजगार मिळावा या हेतूने कागदी पिशव्यांची निर्मिती करत आहेत.
रावेत : प्लॅस्टिक बॅगच्या वापरामुळे पर्यावरण धोक्यात आले आहे. प्रदूषणाला आळा बसावा आणि पर्यावरण संवर्धन व्हावे, यासाठी चिंचवडे नगर येथील शेखर चिंचवडे युथ फाउंडेशनच्या वतीने महिलांसाठी स्वयं रोजगार मिळावा या हेतूने कागदी पिशव्यांची निर्मिती करत आहेत.
परिसरातील गरीब, होतकरू महिलांना रोजगार उपलब्ध करून देऊन महिन्याला हजारो पिशव्यांची निर्मिती करत आहेत. युथ फाउंडेशनने समाजाशी नाळ कायम जोडलेली राहावी म्हणून झाडे लावा, झाडे जगवाचा संदेश देत झाडे लावून त्यांची जपणूक केली आहे. प्रदूषणाला आळा बसावा म्हणून प्लॅस्टिक बॅगला पर्याय म्हणून कागदी पिशव्या बनवण्याची संकल्पना त्यांना सूचली. येणाऱ्या काळात प्लॅस्टिक पिशवीबंदी महाराष्ट्र शासन जारी करण्याची शक्यता आहे. काळाची पावले ओळखून महिलांना घरबसल्या रोजगार मिळावा यासाठी शेखर चिंचवडे युथ फाउंडेशनने हा उपक्रम सुरु केला आहे.
गेल्या दीड वर्षापासून शेखर चिंचवडे युथ फाउंडेशनच्या माध्यमातून चिंचवडेनगर, वाल्हेकरवाडी परिसरातील महिलाना हाताला काम मिळावे यासाठी सर्वप्रथम महिला संघटन करीत सलग ८५ बचत गटांची स्थापना करण्यात आली. बचतगट महासंघ स्थापले गेले. मात्र मागेल त्याला काम या संकल्पनेतून विविध क्षेत्रात महिलाना रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल याकडे नेहमी पाठपुरावा राहिला. नगरसेविका करुणा चिंचवडे यांच्या माध्यमातून विविध उपक्रमामध्ये महिलांना जास्तीत जास्त घरबसल्या काम मिळावे आणि त्यांचे अर्थाजन व्हावे या हेतूने घरबसल्या रद्दीपासून कागदी पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षण गेले दोन दिवस चालू केले यासाठी महिलाचा प्रतिसाद लाभला.
या उपक्रमात सर्वप्रथम तुळजाई बचत गट रजनीगंधा हौसिंग सोसायटी यांनी प्रथम पुढाकार घेतला. या उपक्रमात सुविधा इंगळे, कल्याणी महाजन, शीतल काकडे, संगीता पोळ, किरण चव्हाण, अनुजा जगताप, जयश्री खडकीकर, रोहिणी बेडसे, स्मिता पाटील, सीमा पाठक, सविता पाटील, अमृता चौधरी, सुनीता दुधाळ, कविता धनगर, टीना सिंग, सुरेखा कांबळे, मीरा जगताप, कोमल ढवळे या महिलानी प्रशिक्षण घेतले. मोकळ्या वेळात महिलांनी रद्दीपासून बनवलेल्या कागदी पिशव्या या शेखर चिंचवडे युथ फौंडेशनच्या माध्यमातून ‘प्लॅस्टिक पिशवी टाळा, पर्यावरण वाचवा’ या मोहिमेसाठी संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात देण्यात येणार आहेत. या उपक्रमाच्या यशस्वी संयोजनासाठी शेखर चिंचवडे युथ फाउंडेशनच्या बचतगट महासंघाच्या आशा चिंचवडे यांनी परिश्रम घेतले.