कृष्ण प्रकाश यांची मध्यरात्री वेशांतर करून 'Surprise Visit'; बेजबाबदार पोलिसांची निघाली चांगलीच 'विकेट'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 11:04 PM2021-05-06T23:04:50+5:302021-05-06T23:06:13+5:30
कृष्ण प्रकाश यांचा वेशांतर करून बेजबाबदार पोलिसांना दणका; पोलीस ठाण्यांना भेट देऊन केली नाकाबंदीची पाहणी
पिंपरी : सामान्य नागरिकांशी पोलीस कसे वागतात, त्यांच्या तक्रारी ऐकून घेतात का, याबाबत पाहणी करण्यासाठी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी वेशांतर करून शहरात फिरले. पोलीस ठाण्यांना त्यांनी भेट दिली. तसेच शहरातील नाकाबंदीचीही पाहणी केली. विशेष म्हणजे या वेळी पोलिसांनीही त्यांना ओळखले नाही.
शहरातील पोलीस सामान्य नागरिकांशी सौजन्याने वागत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी स्वत: याबाबत खात्री करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार वेशांतर करून बुधवारी रात्री कृष्ण प्रकाश शहरात फिरले. पिळदार मिश्यांसाठी ओळखले जाणारे कृष्ण प्रकाश यांनी दाढी चिटकवली तसेच डोक्यावर लालसर रंगाचा केसांचा विग देखील चढवला. सहायक आयुक्त प्रेरणा कट्टे आणि इतर दोन पोलीस यांनीसुध्दा वेशांतर करून आयुक्तांसोबत होते.
वेशांतर करून ते दोघे पिंपरी पोलीस ठाण्यात गेले. आमच्या शेजाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्याला रुग्णवाहिका पाहिजे. मात्र, चालक ८००० रुपयांची मागणी करीत आहे. ही आमची लुट आहे, अशी तक्रार त्यांनी केली. मात्र तेथील पोलिसांनी त्यांना दाद दिली नाही. हे आमचे काम नाही, असे त्यावेळी हजर असलेल्या पोलिसाने आयुक्तांना सांगितले. चिडलेल्या कृष्ण प्रकाश यांनी मास्क काढून आपली ओळख सांगितली. त्यामुळे तो पोलीस गोंधळला आणि पोलीस ठाण्यात खळबळ उडाली.
रात्री दीडच्या सुमारास हिंजवडी आणि वाकड पोलीस ठाण्यांमध्ये गेले. आमचा रमजान सुरू आहे. परिसरात काही लोक रोज फटाके वाजवतात, त्याचा त्रास होतो. त्यांना हटकले असता, काहींनी माझ्या बायकोची छेड काढून मला लाथा मारल्या, अशी तक्रार केली. वाकड आणि हिंजवडी पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली. तसेच तक्रार नोंदवून घेण्याची तयारी करून वरिष्ठांना याबाबत माहिती दिली. आमचे वरिष्ठ येतीलच थोड्या वेळात. घाबरू नका, उशीर झाला तर आम्ही सोडू तुम्हाला घरी, असे सांगून दिलासा देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कृष्ण प्रकाश यांनी आपली ओळख सांगितली. तसेच तेथील कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
पिंपरी पोलीस ठाण्याला ‘मेमो’
तक्रारदार म्हणून पिंपरी पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या बेजबाबदारपणाचा वाईट अनुभव आयुक्तांना आला. त्यामुळे त्यांना मेमो बजावण्यात येणार आहे. तसेच हिंजवडी व वाकड पोलीस ठाण्यात चांगला अनुभव आल्याने त्यांना रिवॉर्ड देण्यात येईल, असे कृष्ण प्रकाश यांनी सांगितले. शहरात नाकाबंदी चांगल्या पद्धतीने होत असल्याचे या पाहणीत आयुक्तांना दिसून आले.
कोरोनामुळे लोक त्रासले आहेत. त्यात निर्बंध असल्याने त्यांची अधिक अडचण होत आहे. असे असतानाच सामान्य लोकांना त्रास व्हायला नको, यासाठी वेशांतर करून शहरात फेरफटका मारला. त्यात नागरिकांशी पोलीस कसे वागतात, याची पाहणी केली. वाकड आणि हिंजवडीत चांगला अनुभव आला. मात्र पिंपरी पोलिसांचा प्रतिसाद वाईट होता.
- कृष्ण प्रकाश, पोलीस आयुक्त, पिंपरी- चिंचवड