पिंपरी शहरातील १८७ बालगुन्हेगारांचे पुनर्वसनासाठी होणार सर्वेक्षण : कृष्ण प्रकाश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2020 06:16 PM2020-11-07T18:16:41+5:302020-11-07T18:20:32+5:30

‘‘कोणत्या कारणांमुळे बालक गुन्हेगार होतात, याची पडताळणी झाली पाहिजे..''

Survey for rehabilitation of 187 child delinquents in Pimpri: Krishna Prakash | पिंपरी शहरातील १८७ बालगुन्हेगारांचे पुनर्वसनासाठी होणार सर्वेक्षण : कृष्ण प्रकाश 

पिंपरी शहरातील १८७ बालगुन्हेगारांचे पुनर्वसनासाठी होणार सर्वेक्षण : कृष्ण प्रकाश 

googlenewsNext
ठळक मुद्देसामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींशी साधला संवाद

पिंपरी : बालगुन्हेगारांना योग्य दिशा दाखविल्यास व समुपदेशन केल्यास त्यांची मानसिकता सकारात्मक होऊ शकते. त्यासाठी शहरातील १८७ बालगुन्हेगारांचे सर्वेक्षण करून त्यांचे पुनर्वसन करण्यात येईल. त्यासाठी समाजातील सर्वच घटकांच्या सक्रिय सहभागाची आवश्यकता आहे, असे मत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी व्यक्त केले.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे बाल पथक, पिंपरी-चिंचवड सिटीजन फोरम तसेच कनेक्टिंग एनजीओ यांच्या माध्यमातून शहरातील विविध संस्था व संघटना यांच्या माध्यमातून बालगुन्हेगारांचे पुनर्वसन करण्याबाबत पुढाकार घेण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात त्याबाबत चर्चासत्र झाले होते. त्याचा पुढचा टप्पा म्हणून या उपक्रमाची रुपरेषा तयार करून त्याबाबत प्रत्यक्ष कामकाज सुरू करण्यात येत आहे. त्याबाबत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. पोलीस आयुक्त यांच्या दालनात शुक्रवारी बैठकीचे आयोजन केले होते. गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त आर. आर. पाटील, बाल पथकाचे सहायक आयुक्त डाॅ. सागर कवडे आदी या वेळी उपस्थित होते. 

आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले, ‘‘कोणत्या कारणांमुळे बालक गुन्हेगार होतात, याची पडताळणी झाली पाहिजे. भरकटल्यामुळे काही बालक गुन्हेगारीकडे वळतात. त्यांच्यासाठी सकारात्मक वातावरण तयार करायचे आहे. त्यांच्यातील कलागुण, खेळाची आवड आदी बाबींची नोंद करून त्यांचा कल निश्चित केला पाहिजे. त्यानुसार त्यांना प्रशिक्षण देऊन संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

‘एनएसएस’च्या माध्यमातून सर्वेक्षण
राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) या उपक्रमात सहभागी होणा-या विद्यार्थ्यांची बालगुन्हेगारांच्या सर्वेक्षणासाठी मदत घेण्यात येणार आहे. त्यासाठी पोलीस ठाण्याच्या स्तरावर विशेष पथक नियुक्त केले जाईल. एनएसएसचे विद्यार्थी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी व पोलीस यांचा पथकात समावेश राहील. बालगुन्हेगारांच्या घरी जाऊन त्यांच्या सवयी, कामाचे ठिकाण, शिक्षण, काैटुंबिक माहिती आदींबाबत सर्वेक्षण केले जाईल. 

त्रिसुत्रीचा होणार वापर
बालगुन्हेगारांमध्ये रोजगारक्षम किती आहेत, त्यातील कोणाला कोणत्या प्रशिक्षणाची आवश्यकता आहे, तसेच किती जण प्रशिक्षित असून किती जणांना कोणत्या प्रकारच्या रोजगाराची गरज आहे, याची सविस्तर माहिती संकलित करण्यात येणार आहे. रोजगारक्षम, प्रशिक्षणाची गरज असलेले व रोजगार पाहिजे असलेले अशा पद्धतीने बालगुन्हेगारांची नोंद करण्यात येईल. या त्रिसुत्रीनुसार त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

Web Title: Survey for rehabilitation of 187 child delinquents in Pimpri: Krishna Prakash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.