नातेवाईक महिलेशी अनैतिक संबंधाचा संशय; मावळात तरुणाचा खून, दोन आरोपींना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 12:50 IST2025-04-03T12:50:13+5:302025-04-03T12:50:36+5:30
वडगाव मावळ पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, एक अल्पवयीन आरोपीलाही ताब्यात घेतले आहे

नातेवाईक महिलेशी अनैतिक संबंधाचा संशय; मावळात तरुणाचा खून, दोन आरोपींना अटक
वडगाव मावळ : नातेवाईक महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून मावळ तालुक्यातील कान्हे (आंबेवाडी) येथे एकाचा खून केल्याची घटना घडली. वैभव उमेश सातकर (वय २३) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या खूनप्रकरणी वडगाव मावळ पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, एक अल्पवयीन आरोपीलाही ताब्यात घेतले आहे.
कान्हे आंबेवाडी येथे मंगळवारी (दि.१) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी उमेश सातकर (वय ५३, रा. आंबेवाडी, कान्हे) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अंकुश जयवंत सातकर (रा. आंबेवाडी, कान्हे) आणि त्याच्यासोबत असलेल्या दोन अनोळखी व्यक्तींपैकी सोपान रामचंद्र खेंगले (वय ६५, रा. निगडे, ता. मावळ) यांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच एक विधिसंघर्षित बालकही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
तपासादरम्यान, खुनाचे मुख्य कारण अनैतिक संबंध असल्याचा संशयित आहे. आरोपी अंकुश सातकर याला संशय होता की, वैभव सातकर याचे त्याच्या नातेवाईक महिलेशी अनैतिक संबंध आहेत. या संशयातूनच त्याने आपल्या साथीदारांसह धारदार शस्त्राने वैभवच्या चेहऱ्यावर, डोक्यावर, पाठीवर वार करत त्याचा निर्घृण खून केला.
ही घटना कान्हे आंबेवाडी येथील शेतातील गोठ्याच्या शेजारी असलेल्या रामदास सातकर यांच्या मालकीच्या गट नंबर ५३९ मध्ये घडली. घटनेची माहिती मिळताच वडगाव मावळ पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.