तळेगाव गोळीबार प्रकरणातील संशयितांची पोलिसांनी काढली धिंड

By नारायण बडगुजर | Published: June 24, 2024 11:48 PM2024-06-24T23:48:12+5:302024-06-24T23:49:25+5:30

चिक्या शिंदे याने त्याच्या साथीदारांसोबत मिळून 'आम्ही इथले भाई आहोत आमच्या नादाला कोणी लागायचे नाही' असे मोठमोठ्याने बोलून शिवीगाळ करत तळेगाव दाभाडे शहरातील काही ठिकाणी गोळीबार केला.

suspects in the talegaon firing case have been arrested by the police | तळेगाव गोळीबार प्रकरणातील संशयितांची पोलिसांनी काढली धिंड

तळेगाव गोळीबार प्रकरणातील संशयितांची पोलिसांनी काढली धिंड

नारायण बडगुजर, लोकमत न्यूज नेटवर्क, पिंपरी : तळेगाव दाभाडे शहरात अंदाधुंद गोळीबार करत दहशत निर्माण करणाऱ्या तिघांसह सहा जणांच्या टोळक्याची तळेगांव पोलिसांनी सोमवारी (दि. २४) तळेगाव परिसरातून धिंड काढली.
       
रोहन उर्फ चिक्या उत्तम शिंदे (१८, रा. कातवी रोड, तळेगाव स्टेशन), नीरज उर्फ दाद्या बाबू पवार (१९, रा. नेहरूनगर, पिंपरी), आदित्य नितीन भोईनल्लू (२१, रा. कामाठीपुरा, ता. शिरूर), विकी खराडे आणि अन्य दोघांना अटक केली.
      
चिक्या शिंदे याने त्याच्या साथीदारांसोबत मिळून 'आम्ही इथले भाई आहोत आमच्या नादाला कोणी लागायचे नाही' असे मोठमोठ्याने बोलून शिवीगाळ करत तळेगाव दाभाडे शहरातील गजानन चौक, शाळा चौक, राजेंद्र चौक, मारुती मंदिर चौक अशा ठिकाणी गोळीबार केला. संशयितानी शहरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने गोळीबार केला. गोळीबार केल्यानंतर सर्व संशयित पसार झाले होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर मोठा पोलिस फौजफाटा तळेगाव शहरात दाखल झाला. गोळीबाराचा थरार रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुकानांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. या घटनेमुळे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.
       
या गुन्ह्याचा समांतर तपास करत पिंपरी- चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने मुख्य संशयित रोहन शिंदे, नीरज पवार, आदित्य भोईनल्लू यांना नाशिक येथून ताब्यात घेतले. तर इतर तिघांना तळेगाव पोलिसांनी अटक केली. संशयिताना वडगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. 

पोलिस कोठडीत असताना संशयितांकडे तपास करत पोलिसांनी तीन गावठी पिस्तूल आणि आठ जिवंत काडतुसे जप्त केली. त्यानंतर सोमवारी सायंकाळी सर्व संशयितांची तळेगाव परिसरातून धिंड काढली. ज्या परिसरात गोळीबार करत संशयितांनी दहशत निर्माण केली होती, तिथे बेड्या ठोकून त्यांना फिरवण्यात आले.

संशयितांना अटक केल्यानंतर त्यांनी ज्या भागात गोळीबार केला, त्या भागात पाहणी करण्यासाठी त्यांना नेण्यात आले होते. संशयितांचा दहशत माजवण्याबरोबर आणखी काही उद्देश आहे का याचा तपास सुरू आहे. - देविदास घेवारे, सहायक पोलिस आयुक्त

Web Title: suspects in the talegaon firing case have been arrested by the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.