पिंपरीत कत्तलखाना उभारण्याला स्थगिती
By admin | Published: October 14, 2015 03:22 AM2015-10-14T03:22:39+5:302015-10-14T03:22:39+5:30
येथील डाल्को कंपनीच्या जागेत कत्तलखाना उभारण्यासाठी महापालिकेने केलेल्या जागा फेरबदलाच्या कार्यवाहीला राज्याच्या नगरविकास विभागाने स्थगिती दिली आहे
पिंपरी : येथील डाल्को कंपनीच्या जागेत कत्तलखाना उभारण्यासाठी महापालिकेने केलेल्या जागा फेरबदलाच्या कार्यवाहीला राज्याच्या नगरविकास विभागाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे विविध संस्था, संघटना आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी केलेल्या विरोधाला न जुमानता डाल्को कंपनीच्या जागेतच कत्तलखाना उभारण्याच्या महापालिकेच्या आडमुठ्या भूमिकेला चपराक बसली आहे.
भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांनी प्रस्तावित कत्तलखान्याला तीव्र विरोध केला होता. या जागेत कत्तलखाना उभारण्यास परवानगी देऊ नये, अशी जगताप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली होती.
राजीव गांधी रेल्वे उड्डाणपुलाखाली कित्येक वर्षे सुरू असणारा मोठ्या जनावरांचा कत्तलखाना अनेक संस्था, संघटना, विविध पक्षांच्या विरोधामुळे बंद करण्यात आला. त्यानंतर हा कत्तलखाना कंपनीच्या जागेत उभारण्याचे नियोजन केले. त्यालाही विरोध झाला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने सर्व्हे क्रमांक २०२मधील जागा समाविष्ट करण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मंजूर केला. त्यावर कलम ३७ अंतर्गत जागा फेरबदलाची कार्यवाही केली. त्यानंतर सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला होता. त्याला १२ मार्च २०१५ला सरकारने मंजुरी
दिली होती. (प्रतिनिधी)