संशय आला, ट्रक थांबवला ७४ लाखांची विदेशी दारू जप्त; रावेतमध्ये कारवाई, दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2023 09:11 PM2023-11-03T21:11:01+5:302023-11-03T21:11:19+5:30
पिंपरी : राज्य उत्पादन शुल्क विभागाने देहुरोड - कात्रज बाह्य वळण महामार्गावर रावेत येथे विदेशी मद्य घेऊन जाणारा ट्रक ...
पिंपरी : राज्य उत्पादन शुल्क विभागाने देहुरोड - कात्रज बाह्य वळण महामार्गावर रावेत येथे विदेशी मद्य घेऊन जाणारा ट्रक पकडला. त्यातून तब्बल ७४ लाख ५६ हजार रुपये किमतीच्या ४४ हजार विदेशी दारूच्या बाटल्या जप्त करून दोघांना अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय चंद्रकांत चव्हाण (वय ५३, रा. सातारा), सचिन निवास धोत्रे (वय ३१, रा. सांगली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. देहुरोड - कात्रज बाह्य वळण महामार्गावरून विदेशी मद्याचा एक ट्रक जाणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी रावेत येथे संशयित ट्रक अडवला. ट्रकची झडती घेतली असता त्यामध्ये दारूच्या बाटल्या ठेवलेल्या ८० गोण्या आढळल्या. त्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांच्या ४४ हजार बाटल्या उत्पादन शुल्क विभागाने जप्त केल्या. ट्रक आणि विदेशी मद्य असा १ कोटी १९ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यातील ७४ लाख ५६ हजार रुपयांची केवळ बनावट दारू आहे. आरोपींना अटक करून वडगाव - मावळ न्यायालयात हजर केले.