मोबाईल चोरट्यांचा सुळसुळाट
By admin | Published: July 17, 2017 04:12 AM2017-07-17T04:12:57+5:302017-07-17T04:12:57+5:30
मंगळवारी वाघोली येथे भरणाऱ्या आठवडे बाजारामध्ये ग्राहकांच्या खिशातील मोबाईल शिताफीने चोरून नेण्याच्या घटनांमध्ये
लोकमत न्यूज नेटवर्क
वाघोली : मंगळवारी वाघोली येथे भरणाऱ्या आठवडे बाजारामध्ये ग्राहकांच्या खिशातील मोबाईल शिताफीने चोरून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. प्रत्येक बाजारामध्ये दोन-तीन मोबाईल हमखास चोरीला जाण्याचे सध्याचे प्रमाण असून, यामागे सात ते आठ चोरट्यांचे टोळके कार्यरत असल्याचे व्यापारीवर्गाकडून सांगितले जाते. चोरीच्या घटना वाढत असल्या, तरी पोलीस प्रशासन चोरट्यांना आळा घालण्यात अपयशी ठरत आहेत.
वाघोलीच्या बाजारतळ मैदानामध्ये प्रत्येक मंगळवारी आठवडे बाजार भरतो. वाघोलीसह परिसरातील दहा गावांतील शेतकरी बाजारामध्ये शेतमाल विक्रीसाठी घेऊन येत असतात, त्याचप्रमाणे कपडे, तरकारी, फळे, मासे, चप्पल, किराणामाल विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या मोठी असल्याने बाजारहाट करणाऱ्या ग्राहकांची संख्याही मोठी आहे. खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना मात्र मोबाईल चोरीच्या घटनांना सामोरे जावे लागत आहे. ग्राहकांच्या खिशातील महागडे मोबाईल चोरट्यांना आकर्षित करू लागले आहे. मोबाईलची चोरी करताना चोरट्यांच्या टोळीकडून अतिशय किफायतशीरपणे चोरी केली जाते.
चोरट्यांची टोळी बाजारामध्ये येणारे सावज शोधून त्याचा पाठलाग करतात. सावज तरकारी किंवा इतर वस्तू खरेदी करण्यात व्यस्त असताना डाव साधून मोबाईल किंवा पाकीट लंपास केले जाते. बाजाराच्या गर्दीमध्ये अतिशय शिताफीने चोरी केली जात असताना सावजाला सुधा आपली वस्तू गेल्याचे लक्षात राहत नाही. वस्तू चोरीला गेल्याचे लक्षात येईपर्यंत मोबाईल स्वीच आॅफ व चोरटे फरार झालेले असतात. काही वेळेस चोरटे सापडतातही त्यावेळेस त्याला लाथा बुक्क्यांचा मारदेखील खावा लागतो. चोरटा रंगेहाथ सापडला तरी पोलिसांची कटकट नको म्हणून त्यांना चोप देवून तसेच मोकळे सोडून दिले जाते.
चोरट्यांना बेदम चोप दिला तरीही ते टोळीच्या सदस्यांची व म्होरक्यांची माहिती सांगण्यास तयार नसतात. चोरट्यांमध्ये महिला चोरटे देखील असल्याचे व्यापारी सांगतात. यामुळे मोबाईल चोरट्यांचा मोठा फौजफाटाच तयार झाला असून चोरीमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
वाहतूक पोलिसांना कोंडी सोडवता-सोडवताच नाकी नऊ येत असल्याने चोरीच्या घटनांकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. यासाठी पोलीस अधीक्षकांनी विशेष पोलिसांची साध्या गणवेशातील पोलीस आठवड्याच्या प्रत्येक बाजारामध्ये पाळतीकरिता ठेवावे यावेत, अशी मागणी ग्रामस्थ, व्यापारीवर्ग करीत आहेत. चोरटे पोलिसांच्या हाती लागल्यास मोबाईल चोरट्यांच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होऊ शकतो.