Swachh Survekshan: स्वच्छ सर्वेक्षणात पुणे १० व्या तर पिंपरी-चिंचवड तेराव्या स्थानी
By ज्ञानेश्वर भंडारे | Published: January 11, 2024 03:56 PM2024-01-11T15:56:10+5:302024-01-11T15:56:40+5:30
हे सर्वेक्षण ४० निकषांवर घेण्यात आले. त्याचे 'रँकिंग' अखेर केंद्राने जाहीर केले असून पहिल्या दहा शहरांमध्ये नवी मुंबई महापालिका आणि पुणे शहराचा क्रमांक लागला आहे....
पिंपरी : केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियानांतर्गत घेतलेल्या स्वच्छ सर्व्हेक्षण स्पर्धेत पिंपरी-चिंचवड तेराव्या क्रमांकावर, तर पुणे १० व्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षी २०२२ मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेला या स्पर्धेत १९ वा क्रमांक मिळाला होता. हे सर्वेक्षण ४० निकषांवर घेण्यात आले. त्याचे 'रँकिंग' अखेर केंद्राने जाहीर केले असून पहिल्या दहा शहरांमध्ये नवी मुंबई महापालिका आणि पुणे शहराचा क्रमांक लागला आहे.
देशातील शंभर स्वच्छ शहरांसाठी ही स्पर्धा घेण्यात आली होती. देशातील दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गटात पिंपरी-चिंचवडचा सहभाग होता. यामध्ये देशातील सर्वांत स्वच्छ शहर म्हणून इंदूर शहराने पहिला क्रमांक पटकावला आहे. पिंपरी-चिंचवड शहर पहिल्या दहा क्रमांकामध्ये असेल, असे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले होते. मात्र, अनेक निकषांमध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेला अपेक्षित काम करता आले नाही.
गेल्या वर्षी १९ वा क्रमांक...
स्वच्छ सर्वेक्षणात २०१६ मध्ये शहराचा देशात नववा क्रमांक आला होता. २०१७ मध्ये शहराचा ७२ वा क्रमांक आला हाेता. २०१८ मध्ये ४३ वा क्रमांक, २०१९ मध्ये ५२ वा क्रमांक, २०२० मध्ये २४ वा क्रमांक, २०२१ मध्ये १९ वा क्रमांक, २०२२ मध्येही १९ वा क्रमांक आला हाेता. तर यावर्षी पिंपरी-चिंचवड शहराला १३ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे.
स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये पिंपरी चिंचवड शहर देशात अव्वल स्थानावर येण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात आले. त्यामध्ये विविध स्पर्धा, स्वच्छतेसाठी मोहीम आदीवर काम करण्यात आले. त्यासाठी चार टप्प्यांत सफाई कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. शहर स्वच्छतेसाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम केले केले.
– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक
केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत देश पातळीवर शहरांच्या स्वच्छतेबाबतचे परीक्षण करण्यात आले. यात सेवास्तर गुणांक, नागरिकांचा प्रतिसाद आणि कचरा मुक्त शहर, हागणदारीमुक्त शहर या घटकांवरती केंद्र शासनाने नेमलेल्या त्रयस्थ संस्थेमार्फत परीक्षण करण्यात आले. ओला, सुका प्लास्टिक, घरगुती घातक, इ कचरा वर्गीकृत करण्यास सुरुवात केली. शहरातील ४.८ लक्ष नागरिकांनी स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये आपला सहभाग नोंदविला.
– यशवंत डांगे, सहाय्यक आयुक्त, आरोग्य विभाग