रावेत बंधाऱ्यात दलदल; कचऱ्यातून पाणीउपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 02:46 AM2018-10-31T02:46:03+5:302018-10-31T02:47:26+5:30
गाळ साचल्याने जलपर्णी व कचऱ्याने दलदल झाली आहे. या दुर्गंधीयुक्त पाण्यातून उपसा केला जात असूनही हेच पाणी प्रक्रियेनंतर पिंपरी-चिंचवडकरांच्या गळी उतरविले जाते.
पिंपरी : पवना नदीतून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने रावेत बंधाऱ्यातील पाणी पातळीत घट होत आहे. या बंधाऱ्यातून पाणी उपसा केला जातो. त्या ठिकाणी कोणतीही सुरक्षाव्यवस्था नसल्याने बंधाऱ्यात कचऱ्याचे साम्राज्य वाढले आहे. गाळ साचल्याने जलपर्णी व कचऱ्याने दलदल झाली आहे. या दुर्गंधीयुक्त पाण्यातून उपसा केला जात असूनही हेच पाणी प्रक्रियेनंतर पिंपरी-चिंचवडकरांच्या गळी उतरविले जाते.
शहराला पवना नदीतून १०० टक्के पाणीपुरवठा केला जातो. पवना नदीवर रावेत येथे बंधारा बांधला आहे. या बंधाºयातून रोज ४७० एमएलडी पाणी उपसा करून त्यावर प्रक्रिया केली जाते. त्यानंतर पिण्याच्या पाण्याचा संपूर्ण शहराला पुरवठा केला जातो. सध्या संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने अपुरा पुरवठा होत आहे.
शहरात साथीच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. मात्र, महापालिकेच्या आरोग्य व पाणीपुरवठा विभागाकडून योग्य दक्षता घेतली जात नाही. रावेत बंधाºयाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था नसल्याने कचरा टाकला जात आहे. तसेच, परिसरातील राडारोडा येथे टाकण्यात येतो. त्यामुळे बंधाºयात मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून, जलपर्णी निर्माण झाली आहे. या दलदलीच्या व दुर्गंधीयुक्त पाण्याचा उपसा शुद्धीकरण केंद्राकडे होत आहे. त्यामुळे रोगराई आणखी पसरण्याची भीती स्थानिक नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.
रावेत बंधारा येथे सुरक्षाव्यवस्था नसल्याने कोणीही सहजपणे या ठिकाणी कचरा वा राडारोडा टाकून जाते. या ठिकाणाहून पिंपरी महापालिका, जलसंपदा विभाग व एमआयडीसी यांच्याकडून उपसा केला जातो. मात्र, तिन्ही विभागांत समन्वय नसल्याने अनेक वर्षांपासून येथे गाळ साचून दलदल निर्माण झाली आहे. येथील गाळ काढण्याची आवश्यकता आहे, अशी माहिती स्थानिक कार्यकर्ते संजय फडके व विजय भोंडवे यांनी दिली.