मिठाई घेताय, सावधान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 02:34 AM2018-11-02T02:34:33+5:302018-11-02T02:34:57+5:30
दिवाळीनिमित्त नातेवाईक व मित्रपरिवारात तसेच परिचितांना भेटवस्तू म्हणून अनेक वेळा मिठाई दिली जाते. मात्र, मिठाईसाठी वापरला जाणारा खवा भेसळयुक्त असण्याची शक्यता आहे.
पुणे : दिवाळीनिमित्त नातेवाईक व मित्रपरिवारात तसेच परिचितांना भेटवस्तू म्हणून अनेक वेळा मिठाई दिली जाते. मात्र, मिठाईसाठी वापरला जाणारा खवा भेसळयुक्त असण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवाळीत मिठाई घेताना सावधानता बाळगा, केवळ परवानाधारक विक्रेत्याकडूनच मिठाई खरेदी करा, अधिक भडक रंगाची मिठाई खरेदी करणे टाळा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनातर्फे (एफडीए) करण्यात आले आहे.
दिवाळीत एकमेकांना गोडधोड देऊन आनंद द्विगुणित केला जातो. त्यामुळे बाजारात चांगल्या दर्जाची मिठाई उपलब्ध असणे आवश्यक आहे. परंतु, शहरातील काही व्यापाऱ्यांकडून भेसळयुक्त खव्यापासून मिठाई तयार केली जात असल्याचे यापूर्वी निदर्शनास आले आहे. प्रामुख्याने गुजरातमधून खव्यासारखा दिसणारा पदार्थ पुण्यातील मिठाई तयार करणाºया व्यावसायिकांकडून खरेदी केला जातो. त्यापासून मिठाई तयार केली जाते. मात्र, खव्यासारख्या दिसणाºया पदार्थाची वाहतूक खासगी बसमधून अनियंत्रित तापमानात केली जाते. त्यामुळे या पदार्थापासून तयार केलेले खाद्यपदार्थ आरोग्याला अपायकारक ठरू शकतात.
एफडीचे सहायक आयुक्त एस. पी. शिंदे व त्यांच्या सहकाºयांनी गेल्या ३ महिन्यांत ३१ लाख ८२ हजार ४३२ रुपये किमत्तीचा खव्यासारखा दिसणारा पदार्थ जप्त केला आहे. प्रामुख्याने गुजरात राज्यातून अहमदाबाद, गांधीनगर, गोझाना, मेहसाना, तसेच जुनागड, राजकोट येथून खासगी ट्रॅव्हल्समधून हा गोड खवा येतो. एफडीने १७ हजार ५५२ किलो खव्यावर कारवाई केली आहे. परंतु, महिनाभरापासून हा खवा पुण्यात येण्याचे बंद झाले असल्याचा दावा मिठाई विक्रेत्यांनी केला आहे.
भडक रंगाचे खाद्यपदार्थ शरीराला अपायकारक असतात. त्यामुळे ते खाद्यपदार्थ टाळावेत. तसेच, नागरिकांनी एफडीएच्या परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खाद्यपदार्थ खरेदी करावेत.
- सुरेश देशमुख, सहआयुक्त, एफडीए, पुणे
गुजरात येथून पाठविल्या जाणाºया खव्याचा आम्ही निषेधच करतो. काही छोट्या मिठाई विकेत्यांकडून नफेखोरीसाठी या खव्याचा वापर केला जातो. पुण्यातील एकाही व्यापाºयांकडून गुजरातच्या खव्याची मागणी केली जात नाही. अन्न व औषध प्रशासन विभागाकडून नियमानुसार केली जाणारी कारवाई योग्यच आहे.
श्रीकृष्ण चितळे, अध्यक्ष, मिठाई विक्रेते असोसिएशन
भेसळीतून नफा वाढविण्याचे गणित
साधारणपणे एक लिटर दुधापासून सुमारे २०० ग्रॅम खवा तयार होतो. त्यामुळे एक किलो खवा तयार करण्यासाठी पाच लिटर दूध लागते. त्यामुळे खव्यापासून तयार करण्यात आलेली मिठाई सुमारे ४८० रुपये किलोपर्यंत विकली जाते. परंतु, दूध पावडर, वनस्पती तेल आणि साखर टाकून तयार करण्यात आलेल्या खव्यासारखा दिसणारा पदार्थ मिठाई विक्रेत्यांकडून केवळ १८० रुपये प्रतिकिलो दराने विकत घेतला जातो. त्यापासून मिठाई तयार करून विकली, तर मिठाई विक्रेत्यांना सुमारे ३०० रुपये नफा कमावता येतो.