जीवरक्षकाअभावी तरण तलाव बंद
By Admin | Published: June 2, 2017 02:10 AM2017-06-02T02:10:49+5:302017-06-02T02:10:49+5:30
नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम येथील जलतरण तलावामध्ये जीवरक्षक उपस्थित नसल्या कारणाने बुधवारी सकाळच्या
निशिकांत पटवर्धन/ लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम येथील जलतरण तलावामध्ये जीवरक्षक उपस्थित नसल्या कारणाने बुधवारी सकाळच्या वेळी तलाव बंद ठेवण्यात आला होता. पोहण्यासाठी आलेल्या अनेक जणांना तलाव बंद का आहे? याची कुठेही सूचना न दिल्याने प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त केली.
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत सद्य:स्थितीत १२ जलतरण तलाव आहेत. शाळांना सुटी पडल्याने पोहोण्यास शिकविण्यासाठी येणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. शाळा सुरू होण्यास अजूनही १० ते १२ दिवस असल्याने पोहण्याचा आनंद घेण्यासाठी बालचमू जलतरण तलावाकडे आकर्षित होतात. मात्र, बुधवारी सकाळी नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडिअम येथील जलतरण तलाव जीवरक्षकाअभावी बंद असल्याचे तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितले.
उन्हाळी शिबिरासाठी पालकांना आकर्षित करण्याचे फंडे सध्या सुरू आहेत. निगडी, प्राधिकरण, भोसरी, पिंपळे-सौदागर, पिंपरी भागात शिबिरांचे फलक लागले आहेत. पोहणे शिकण्यास क्लास लावण्याचे काही ठिकाणी २ हजार ते ३ हजार फी आकारली जाते. महापालिकेच्या जलतरण तलावाचे एका तासासाठी एका व्यक्तीला १० रुपये नाममात्र शुल्क आकारले जाते. मात्र, भरमसाठ फी भरूनही अनेकजणांना पोहायला येत नसल्याच्या तक्रारी हे शिबिर लावणारे पालक करतात.
महापालिकेकडून जलतरण तलावामध्ये एका वेळी फक्त शंभर व्यक्तींनाच तलावात उतरता येईल असा आयुक्तांकडून आदेश आल्याने हा नियम पाळण्यात येतो. मात्र, आधीच शिबिरासाठी आलेली मुले, तसेच पोहोण्यास शिकण्यासाठी येणाऱ्यांनाही गर्दीमुळे अडचणी येत आहेत. नियमितपणे पोहोण्यास येणाऱ्यांची गैरसोय होत आहे. वर्षभराचे शुल्क भरूनही पोहोण्यासाठी जागा मिळत नाही. शनिवार, रविवार या सुटीच्या दिवसांत तर तलावाकडे फिरकू नये. अशी परिस्थिती निर्माण होते.
शहर परिसरात असणाऱ्या प्रत्येक जलतरण तलावामध्ये अपुरे जीवरक्षक असल्याचे समोर आले असून पालिका प्रशासन नागरिकांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करत आहे. महापालिका प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आदेशानुसार जलतरण तलावामध्ये पोहणाऱ्यांची किमान संख्या निश्चित करण्यात आल्याने १०० तिकीटे देण्यात येतात. अशातच जीवरक्षकांची संख्या अपुरी असल्याने जीवरक्षक नसल्यास सुरक्षिततेसाठी संपूर्ण तलाव बंद ठेवण्यात येतो. अशीच परिस्थिती राहिली तर पोहायला शिकायचे तरी कसे? असा मुद्दा नागरिकांनी उपस्थित केला आहे. महापालिका जलतरण तलावामध्ये जादा जीवरक्षक का नेमले जात नाही? असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे.
जीवरक्षकांचा अभाव : लवकरच भरती करणार
महापालिकेकडून आलेल्या आदेशानुसार जलतरण तलावात एका वेळी फक्त १०० जणांनाच प्रवेश दिला जातो. सध्या सुट्ट्यांचा कालावधी असल्याने गर्दी होत आहे. पिंपरी-चिंचवड परिसरात एकूण १२ जलतरण तलाव असून, १९ जीवरक्षक व १४ मदतनीस आहे. प्रत्यक्षात शहरात जलतरण तलावावर ५३ जीवरक्षकांची गरज आहे. जीवरक्षक भरतीसाठी नोव्हेंबरमध्ये भरती प्रक्रियेसाठी टेंडर मागविले होते. मात्र, टेंडरला प्रतिसाद न आल्याने आता प्रत्यक्ष मुलाखत घेऊन ही प्रक्रिया लवकरच पूर्ण करणार आहे, असे अण्णासाहेब मगर स्टेडियम जलतरण तलावाचे अशोक पटेकर यांनी सांगितले.
अण्णासाहेब मगर स्टेडियम जलतरण तलावामध्ये अनेक गैरसोर्इंना येथे पोहायला येणाऱ्यांना सामना करावा लागतो. कपडे बदलण्यासाठी असलेल्या जागेत पोहण्या आधी व नंतर शॉवर घेऊन झाल्यावर कपडे बदलण्यासाठी येथे गर्दी होते. फरशीवर सर्वत्र पाणी असल्याने अनेकवेळा पाय सटकून पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. येथील पाणी निचरा होण्यासाठी कोणतेही उपाय केलेले दिसून येत नाही. या ठिकाणी कर्मचारी सुद्धा स्वच्छता करताना दिसून येत नाही. येथील काही शॉवर बिघडले असल्याने काही ठराविकच शॉवर सुरू असतात परिणामी शॉवर घेण्यासाठी गर्दी होते.
कधी विजेचे तर कधी पाण्याचे कारण
नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम येथील जलतरण तलावाचे मागील वर्षी नूतनीकरण करण्यात आले. मात्र, तलाव नूतनीकरणानंतरही अधूनमधून बंद ठेवला जातो. या शिवाय शहरातील महापालिकेचे तलाव विविध कारणास्तव बंद ठेवले जातात. कधी रात्री लाईट नसल्याने, तर कधी पाणी नसल्याने तलाव बंद ठेवण्यात येतात.
शहरात १२ जलतरण तलावावर फक्त १९ जीवरक्षक आहेत. नियमानुसार, पोहण्यासाठी येणाऱ्या २५ व्यक्तींमागे एक जीवरक्षक असणे अनिवार्य आहे. पालिकेच्या जलतरण तलावात रोज सकाळी चार आणि सायंकाळी चार अशा आठ बॅच तयार केल्या आहेत. मात्र, सुट्टीचा कालावधी असल्याने पोहायला येणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
पालिकेच्या जलतरण तलावांवार ठेकेदारीपद्धतीवर जीवरक्षक नेमले जातात. मात्र, तलावांच्या संख्येच्या तुलनेत जीवरक्षक कमी आहेत. तलावात जीवरक्षकाबरोबर अन्य मनुष्यबळाचीही संख्या वाढविण्यात यावी, अशी मागणीही होत आहे. त्याकडे दुर्लक्ष होत आहे. जीवरक्षकांच्या नेमणुकीसाठी प्रशासन गांभिर्याने का घेत नाही असा सवाल नागरिक करीत आहे.