स्वाइन फ्लू नोव्हेंबरमध्ये झाला थंड, नागरिकांचा सुटकेचा नि:श्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 01:06 AM2018-11-15T01:06:12+5:302018-11-15T01:06:33+5:30
नागरिकांचा सुटकेचा नि:श्वास : बदलत्या हवामानामुळे महिनाभरात नाही एकही रुग्ण
पिंपरी : जुलै महिन्यामध्ये अचानक डोके वर काढलेल्या स्वाइन फ्लूने चार महिने अक्षरश: थैमान घातले होते. जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत ३३ रुग्णांचा या आजाराने बळी घेतला आहे. मात्र, बदलत्या हवामानामुळे महिनाभरामध्ये स्वाइन फ्लूचा एकही रुग्ण आढळला नसल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. त्यामुळे आरोग्य विभागासह शहरातील नागरिकांनीही सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
पावसाळ्यात स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ होऊ लागली. त्याचप्रमाणे मृतांची संख्याही दिवसेंदिवस वाढत होती. त्यामुळे शहरवासीयांमध्ये स्वाइन फ्लूची दहशत होती. महिन्याभरापूर्वी कधी पाऊस, तर कधी कडक ऊन या वातावरणामुळे विषाणंूना पोषक वातावरण होते. मात्र आता बदललेल्या वातावरणाचे अनुकूल परिणाम दिसू लागले आहेत. १७ आॅक्टोबरपासून स्वाइन फ्लूचा एकही रुग्ण आढळला नाही. आॅगस्ट संपूर्ण व आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सर्वाधिक रुग्ण आढळले होते. जानेवारी महिन्यापासून २४३ रुग्णांना या जीवघेण्या आजाराची लागण झाली होती. मात्र, महिनाभरापासून एकाही रुग्णाला लागण झाली नाही. तसेच यापूर्वी लागण झालेल्या एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
विषाणूंसाठी प्रतिकूल वातावरण
स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या मर्यादित, मात्र मृत्यूचे प्रमाण अधिक; तर डेंगीच्या रुग्णांची संख्या जास्त, त्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण नगण्य होते. शहरातील विविध खासगी व महापालिका रुग्णालयांमध्ये स्वाइन फ्लूचे रुग्ण उपचार घेत होते. हवामानात अनुकूल बदल झाल्यामुळे स्वाइन फ्लूच्या विषाणूंना प्रतिकूल वातावरण तयार झाले आहे. परिणामी मागील एक महिन्यामध्ये एकही रुग्ण आढळला नाही. स्वाइन फ्लूच्या रुग्णसंख्येमध्ये घट झाल्याने नागरिकांसह आरोग्य विभागानेही सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
आरोग्य विभागाची जनजागृती मोहीम सुरू
शहरातील स्वाइन फ्लूच्या वाढत्या रुग्णांमुळे प्रशासनाला सातत्याने रोषाला सामोरे जावे लागत होते. दिवसेंदिवस रुग्णसंख्या व मृतांची संख्या वाढत असल्यामुळे आरोग्य विभागाला चांगलेच धारेवर धरण्यात आले होते. स्वाइन फ्लूपासून संरक्षणासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी. यासाठी जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली होती. शहरामध्ये रिक्षांवर स्पीकर लावून स्वाइन फ्लूविषयी जनजागृती करण्यात येत आहे.