‘स्वाइन फ्लू’ने झाला आणखी एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 07:21 AM2017-07-26T07:21:23+5:302017-07-26T07:21:26+5:30
स्वाइन फ्लूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शहरातील आणखी एका व्यक्तीचा बळी घेतला. सातारा येथून उपचारासाठी आणलेल्या ७३ वर्षीय इसमाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला
पिंपरी : स्वाइन फ्लूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शहरातील आणखी एका व्यक्तीचा बळी घेतला. सातारा येथून उपचारासाठी आणलेल्या ७३ वर्षीय इसमाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. या रुग्णाला सर्दी, तापाचा त्रास होऊ लागल्याने १४ जुलै रोजी निगडीतील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याच दिवशी घशातील द्रव तपासणीसाठी पाठविण्यात आला. अधिक त्रास जाणवू लागल्याने संबंधित रुग्णाला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. रविवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळल्याने शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नवीन रुग्ण वाढल्यामुळे शहरातील स्वाइन फ्लू रुग्णांची संख्या १९८ वर पोचली आहे. आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू झाला आहे. चार संशयितांच्या घशातील द्रव प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले.
आठवड्यात १६ रुग्ण
आठवड्यात शहरात स्वाइन फ्लूचे १६ रुग्ण आढळले आहेत. ३१५ रुग्ण सर्दी, तापासारख्या आजारांनी त्रस्त झाले असल्याचे आढळले आहे. ३४ रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. एकूण ६ हजार २५३ संशयितांना टॅमी फ्लूच्या गोळ्यांचे वाटप करण्यात आल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून देण्यात आली.