पिंपरीतील यंत्रणा तिसऱ्या लाटेसाठी सज्ज; शहरातील कोव्हीड सेंटरमध्ये २०१७ बेड रिकामे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 12:01 PM2021-08-11T12:01:33+5:302021-08-11T12:01:42+5:30
शहरात सद्यस्थितीत वीस कोविड केअर सेंटर सुरू; दाखल रुग्ण १६० अन् सक्रिय ८१२ जणांवर उपचार
पिंपरी : शहरात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढू नये, म्हणून महापालिकेने रुग्णांना गृहविलगीकरणाचा पर्याय देणे बंद केले आहे. ज्या रुग्णांना खूप अडचण आहे. अशाच रुग्णांना गृहविलगीकरणाचा पर्याय दिला जात आहे. शहरात सद्यस्थितीत वीस कोविड केअर सेंटर सुरू आहेत. यामध्ये सद्यस्थितीत १६० रुग्ण उपचार घेत आहेत. वैद्यकीय तज्ज्ञांनी संभाव्य तीसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून रुग्णांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात येत आहे. तसेच संभाव्य तिसरी लाट आली तर उपाययोजना म्हणून कोविड केअर सेंटर सज्ज ठेवण्यात आले आहेत.
शहरात सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. सद्यस्थितीत शहरात ८१२ सक्रिय रुग्ण आहेत. शहरात कोविड केअर सेंटर बरोबरच महापालिका रुग्णालयातदेखील कोरोना रुग्णावर उपचार सुरू आहेत. गंभीर रुग्णांना रुग्णालयात तर सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात येत आहे.
लहान मुलांसाठी स्वतंत्र वार्ड
पुढील काही महिन्यांमध्ये संभाव्य तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने महापालिका प्रशासनाने उपायोजना सुरू केल्या आहेत. तसेच लहान मुलांसाठी वायसीएम आणि जिजामाता रुग्णालयात वार्ड तयार करण्यात आले आहेत.
सद्यस्थिती
कोविड केअर सेंटर सुरू : २०
बेड क्षमता : २१७७
सध्या दाखल रुग्ण : १६०
सक्रिय रुग्ण : ८१२
रिकामे बेड : २०१७