पाच वर्षांत ३५ झाडांची पद्धतशीर कत्तल
By Admin | Published: April 29, 2017 04:03 AM2017-04-29T04:03:49+5:302017-04-29T04:03:49+5:30
रोप विके्रतेच झाडांचे भक्षक झाल्याचे चित्र परंदवडी-सोमाटणे रस्त्यावर पहावयास मिळते. गेल्या पाच वर्षांत येथील ३५ झाडांची
उर्से : रोप विके्रतेच झाडांचे भक्षक झाल्याचे चित्र परंदवडी-सोमाटणे रस्त्यावर पहावयास मिळते. गेल्या पाच वर्षांत येथील ३५ झाडांची अतिशय हुशारीने कत्तल करण्यात आली. दोन्ही बाजूंनी असणारी झाडांची संख्या खूपच कमी झाली आहे. झाडांच्या बुंध्याजवळच प्लॅस्टिकच्या पिशव्या जाळल्या जात आहेत. वन विभागाने या ठिकाणी पाहणी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी पर्यावरणप्रेमी नागरिकांची मागणी आहे.
झाडांचे संवर्धन करणे काळाची गरज असताना काही लोकांकडून नियम धाब्यावर बसून वक्षतोड केली जात आहे. यासाठी ना वन विभागाची परवानगी घेतली जाते, ना ग्रामपंचायतीची. सोमाटणे-परंदवडी हा रस्ता पवन मावळातील गावांना, जोडणारा मुख्य रस्ता आहे. पूर्वी रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची संख्या खूप होती. मात्र, गेल्या पाच वर्षांत या भागात नागरिकरणाबरोबर वाहतूकही वाढली आहे. येथे नर्सरी उद्योगांची संख्याही वाढली. रस्त्याच्या दुतर्फा ४० ते ५० नर्सरी आहेत. सुुमारे तीन किलोमीटर रस्त्यालगत जवळपास ११० झाडे आहेत. पाच वर्षांपूर्वी सोमाटणे हद्दीतील नर्सरी व्यावसायिकांनी येथील झाडे आपल्या व्यवसायास अडचण होऊ नये म्हणून, अतिशय हुशारीने झाडे हलवण्यासाठी प्रयत्न सुरूकेले. ते कोणाच्याही लक्षात आले नाही. नर्सरी व्यवसायातील वापरून झालेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या मोठ्या झाडांच्या बुंध्यापाशी जाळून टाकल्या जात होत्या. पिशव्या जाळत असताना, झाडांचा बुंधा हळूहळू जळत होता. यामुळे काही दिवसांनी झाडांची पाने गळणे, झाड सुकण्याची प्रक्रिया सुुरू झाली. कालांतराने झाडाला कीड लागली, असेच जमीन मालकांसह कोणालाही वाटू शकते. त्याचा फायदा घेत नर्सरी व्यावसायिक झाड खराब झाल्याचे दाखवून सरपणासाठी उपयोग करून घेतात. गेल्या पाच वर्षांत अशा पद्धतीने ३० ते ३५ झाडांची कत्तल झाली आहे. सध्या ७ ते ८ झाडे पूर्णपणे सुकलेली दिसत आहेत. ही झाडे कशामुळे सुकली आहेत? का सुकविली जात आहेत? हे कधी कोणी जाणून घेतले नाही. जमीन मालकानेही नाही. झाडे तोडणे हा गंभीर गुन्हा असतानाही शासनाच्या ताब्यातील रंग लावलेल्या झाडांचीही कत्तल करण्यात आली आहे. (वार्ताहर)