टाळ-मृदंगाने दुमदुमली अलंकापुरी
By admin | Published: July 8, 2015 02:20 AM2015-07-08T02:20:27+5:302015-07-08T02:20:27+5:30
हाती भगव्या पताका, मुखी हरिनामाचा गजर व टाळ- मृदंगाच्या गजराने अवघी अलंकापुरी दुमदुमून गेली आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या १८५ व्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान गुरुवारी (९ जुलैै) होणार असून,
नितीन शिंदे आळंदी
हाती भगव्या पताका, मुखी हरिनामाचा गजर व टाळ- मृदंगाच्या गजराने अवघी अलंकापुरी दुमदुमून गेली आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या १८५ व्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान गुरुवारी (९ जुलैै) होणार असून, हजारो वारकरी दाखल झाले आहेत. माऊलींच्या समाधी दर्शनासाठी वारकऱ्यांनी मंगळवारी गर्दी केली होती. ही रांग दीड किलोमीटरपर्यंत पोहोचली होती. यंदाच्या पालखी सोहळ्यात ४२८ दिंड्या सहभागी होणार आहेत.
आषाढी वारीत सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यांतून विविध दिंड्या दाखल होऊ लागल्या आहेत. आळंदीत दाखल झालेले वारकरी इंद्रायणीत मोठ्या भक्तिभावाने स्नान करीत होते. दर्शनासाठी भक्ती सोपान पुलावरून दर्शनबारीची सोय केली आहे. गर्दी वाढल्याने ही रांग सुमारे दीड किलोमीटर गेली होती. आबालवृद्ध, महिलांसह हजारो वारकरी या रांगेत तासन्तास उभे होते.
वारकऱ्यांना पाणी व्यवस्थित व चांगले मिळावे, यासाठी नगर पालिकेच्या वतीने २४ तास पाणीपुरवठा करण्यात येत असून, पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून दररोज चार तास अतिरिक्त पाणीपुरवठा केला जाणार आहे. आरोग्यासाठी तीन शिफ्टमध्ये कचरा उचलणे, औषध फवारणी व धूरफवारणी सातत्याने सुरू आहे. वारकऱ्यांना इंद्रायणीत स्नानासाठी पाणी कमी पडू नये यासाठी वडवळे धरणातून पाणी सोडले आहे, अशी माहिती आळंदी नगर परिषदेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी दिली आहे.