जात पंचायतीवर कारवाई करा - नीलम गोऱ्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 02:50 AM2018-01-31T02:50:38+5:302018-01-31T02:51:02+5:30
पिंपरी-चिंचवड शहरातील कंजारभाट जात पंचायत व समाजकंटकांविरुद्ध पुढे कोणतीच कारवाई केली नाही. या प्रकरणाची चौकशी करावी, तरी उपरोक्त प्रकरणी तातडीने संबंधित जात पंचायत व समाजकंटकांविरुद्ध कारवाई करावी
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील कंजारभाट जात पंचायत व समाजकंटकांविरुद्ध पुढे कोणतीच कारवाई केली नाही. या प्रकरणाची चौकशी करावी, तरी उपरोक्त प्रकरणी तातडीने संबंधित जात पंचायत व समाजकंटकांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेच्या उपनेत्या डॉ. नीलम गो-हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
भाटनगर सर्व्हे नं. ८/१, पवार हेअर ड्रेसर्स जवळ प्रशांत अंकुश इंद्रेकर राहतात. ते प्रॉपर्टी एंजट म्हणून काम करतात. ते कंजारभाट समाजाचे असून त्यांच्या समाजामध्ये लग्न झाल्यानंतर पहिल्या रात्री मुलीची कौमार्याची चाचणी करण्याची प्रथेविरोधात व्हॉट्सअॅप ग्रुप करून
समाजामध्ये जनजागृतीचे कार्य करीत आहेत. त्यांच्या कामाला त्यांच्या समाजाच्या जातपंचायतीचा विरोध आहे. त्यांच्या समाजातील सनी मलके यांच्या बहिणीच्या लग्नाचे निमंत्रण असल्याने इंद्रेकर व त्यांचे कुटुंब लग्नसोहळ्यास उपस्थित होते. यावेळी इंदे्रकर यांच्याशी वादावादी करण्यात आली. त्यात एकाची सोन्याची चेन, लॉकेट, मनगटी घड्याळ हरवले. ही घटना घडत असताना इंद्रेकर यांच्या काही साथीदारांनी पोलिसांना फोन करून घटनेबाबत कळविले. तसेच भाटनगर पिंपरी, पुणे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
या घटनेला आठ दिवसांचा कालावधी लोटूनही अद्यापपर्यंत संबंधित जात पंचायत व समाजकंटकांविरुद्ध पुढे कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. संबंधित जात पंचायत व समाजकंटकांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश संबंधित अधिकाºयांना देण्यात यावेत, अशी मागणी गोºहे यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
हा लग्नसोहळा आटोपल्यानंतर त्या ठिकाणी जातपंचायत बसली होती. या जातपंचायतीच्या कार्यक्रमात त्यांनी कोणताही अडथळा वा विरोध केला नसतानाही जातपंचायतीचा कार्यक्रम संपताच जातीपंचायतीचे लोक व अन्य समाजकंटकांनी इंद्रेकर यांच्या साथीदारांना त्यांच्या कामाबद्दल धमक्या दिल्या.