विधानसभा निवडणुकीतील बंडखोरांवर दोन दिवसात कारवाई : श्रीरंग बारणे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2019 03:30 PM2019-10-09T15:30:52+5:302019-10-09T15:42:04+5:30
कोणत्याही बंडखोरास पक्षाचे नेते, कार्यकर्ते पाठिंबा देणार नाहीत...
पिंपरी : विधानसभा निवडणूकीत बंडखोरी करणाऱ्यांवर शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या वतीने दोन दिवसात कारवाई होईल, कोणत्याही बंडखोरास पक्षाचे नेते, कार्यकर्ते पाठिंबा देणार नाहीत, अशी भूमिका खासदार श्रीरंग बारणे यांनी पत्रकार परिषदेत जाहिर केली.
पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदार संघातील महायुतीची पत्रकार परिषद झाली. यावेळी खासदार अमर साबळे, शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, आमदार गौतम चाबुकस्वार, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, आरपीआयच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, शिवसेना जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे, शहरप्रमुख योगेश बाबर, प्रदेश प्रतिनिधी उमा खापरे आदी उपस्थित होते.
महायुतीच्या वतीने खासदार बारणे यांनी भूमिका जाहीर केली. चिंचवडमधून शिवसेना गटनेते राहुल कलाटे, पिंपरीतून भाजपा नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ, तसेच भाजपाच्या नगरसेविका सीमा सावळे यांनी दर्यापूरमधून उमेदवारी कायम ठेवली आहे. बंडखोराबाबत भूमिका काय? यावर बारणे म्हणाले, पक्षाच्या वतीने कोणीही बंडखोरी केलेली नाही. त्यांना कोणाचीही साथ नाही. महायुतीबरोबरच शिवसेना आहे. भाजपा आणि शिवसेनेचे वरिष्ठ नेते बंडखोराबाबत निर्णय घेणार आहेत. सोनकांबळे म्हणाल्या, आरपीआयची बैठक झाली. त्यानुसार महायुतीतील घटक पक्ष म्हणून आम्ही शिवसेना आणि भाजपाच्या उमेदवारांबरोबर आहोत.