पिंपरी चिंचवड येथील पाणी चोरांवर कारवाई करा : महापौर राहुल जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 04:10 PM2019-07-23T16:10:59+5:302019-07-23T16:14:26+5:30
पाणीपुरवठा पाईपलाइन चुकीच्या टाकणाऱ्या ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करा..
पिंपरी : शहर विकासासाठी संबंधित विभागाचे पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका यांनी उपस्थित केलेल्या समस्यांचे त्वरित निराकरण करून त्याचा अहवाल सादर करावा, अशा सूचना महापौर राहुल जाधव यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. पाणीपुरवठा पाईपलाईन चुकीच्या टाकणाऱ्या ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करणे, मोटारी लावून पाणी घेणाऱ्यांवर कारवाई कराव्यात, अशा सूचना केल्या़
प्रभाग स्तरावरील अडचणी व विकास कामांबाबतच्या आढावा बैठकांचे आयोजन सर्व प्रभाग कार्यालयांमध्ये त्यांनी केले असून, ग प्रभागाची बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली़ त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला ग प्रभाग अध्यक्षा अर्चना बारणे, नगरसदस्या मनीषा पवार, सविता खुळे, सुनीता तापकीर, नगरसदस्य संदीप वाघिरे, अभिषेक बारणे, कैलास बारणे, नीलेश बारणे, बाबासाहेब त्रिभुवन, चंद्रकांत नखाते, प्रभाग समिती स्वीकृत सदस्य संदीप गाडे, गोपाल माळेकर, विनोद तापकीर, कार्यकारी अभियंता देवन्ना गट्टुवार, प्रशांत पाटील, मुख्य उद्यान अधीक्षक सुरेश साळुंके, प्रशासन अधिकारी प्रभावती गाडेकर, श्रीकांत कोळप, कार्यालयीन अधीक्षक रामकृष्ण आघाव, माहिती व जनसंपर्क विभागाचे मुख्य लिपिक रमेश भोसले आदी उपस्थित होते.
महापौर जाधव यांनी ग प्रभागातील सर्व भागांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत करणे, बिगर परवाना नळ कनेक्शन घेतलेल्या नागरिकांवर कारवाई करणे, दूषित पाणीपुरवठा होणार नाही याकडे लक्ष देणे, पाणीपुरवठा पाईपलाइन चुकीच्या टाकणाऱ्या ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करणे, मोटारी लावून पाणी घेणाऱ्यां वर कारवाई करणे, जुन्या पाण्याच्या पाईपलाईन काढून टाकून सुव्यवस्थित नवीन पाईपलाईन टाकणे, मच्छर, डुक्करे, भटकंती कुत्रे, रस्त्यावरील गुरे, यांचा नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून संरक्षण देणे. इमारतीमधील झाडांच्या मुळाचा उपद्रव वाढलेला आहे, ती झाडे मनपा नियमानुसार काढून टाकणे, कर्मचारी वर्ग वाढविणे यांचबरोबर महापालिकेच्या आरक्षित जागेवर जलशुद्धीकरण केंद्र उभारणे अशाही सूचना महापौर जाधव यांनी केल्या आहेत.