नवरात्र उत्सवाच्या काळात काळजी घ्या, बेफिकीर राहू नका: आयुक्त श्रावण हर्डीकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 08:56 PM2020-10-15T20:56:38+5:302020-10-15T20:57:34+5:30
गणेशोत्सवानंतर कोरोनाच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ
पिंपरी: कोरोनाची साथ अजून संपलेली नाही. त्यामुळे बेफिकीर राहून चालणार नाही. गणेशोत्सवानंतर कोरोनाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय अशी वाढ दिसली आली. त्यामुळे येत्या नवरात्र उत्सवात अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणच्या उत्सवाला यावर्षी मुरड घालून साधेपणाने मात्र आंतरिक भक्ती भावाने नवरात्र उत्सव साजरा करावा. दांडिया, रावण दहन सारखे कार्यक्रम घेता येणार नाहीत. भक्ती भावाने आप-आपल्या घरातच देवीची पूजा करावी आणि निरोगी भवितव्याची प्रार्थना करावी, असे आवाहन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.
आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी नागरिकांना आवाहन केले. आयुक्त हर्डीकर म्हणाले, गेल्या सहा महिन्यांपासून कोरोनाच्या महामारीला सामोरे जात आहोत. यामुळे शहराने अपरिमित नुकसान पाहिले आहे. अनेक नागरिक कोरोनाग्रस्त झाले आणि अनेक बरे देखील झाले. मात्र, काही जणांना या साथीत जीव गमवावा लागला आहे. गेल्या सहा महिन्यात शहरातील नागरिकांनी पालिकेला खूप चांगले सहकार्य केले आहे. या कालावधीत आपण अनेक गोष्टी अनुभवायला शिकलो आहोत. ''
...........
नवरात्र उत्सवात अधिक खबरदारी घेणे आवश्यक गणेशोत्सवात सार्वजनिक गणेशोत्सवाची अंमलबजावणी नियंत्रित केली. विसर्जनासह विविध कार्यक्रम नियंत्रित केले. तरी देखील गणेशोत्सवानंतर कोरोनाच्या साथीत लक्षणीय अशी वाढ दिसली. हा अनुभव लक्षात घेता. येत्या नवरात्र उत्सवात अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोरोना साथ रोगाचा अद्यापपर्यंत पूर्णतः नयनाट झालेला नाही. कोरोना गेलेला नाही. त्यामुळे बेफिकीर राहून चालणार नाही, असेही हर्डीकर म्हणाले.
...............
ज्येष्ठ नागरिकांनी काळजी घ्यावी हर्डीकर म्हणाले, ''कोरोना कधीही होऊ शकतो. अनेकांना अद्यापपर्यंत कोरोनाची लागण झालेली नाही. होऊ नये यासाठी प्रत्येकानेच काळजी घेण्याची गरज आहे. विशेष अथवाने जेष्ठ नागरिक, ज्यांचे वय ६५वर्षांहून अधिक आहे. अन्य दुर्धर आजाराने पीडित आहेत. त्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे जेष्ठ नागरिकांची काळजी घेणे, सतर्क राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी नवरात्र उत्सव साधेपणाने साजरा करावा. सार्वजनिक ठिकाणच्या उत्सवाला यावर्षी मुरड घालावी. साधेपणाने मात्र, आंतरिक भक्ती भावाने नवरात्र उत्सव साजरा करावा. दांडिया, रावण दहन सारखे कार्यक्रम घेता येणार नाहीत. भक्ती भावाने घरातच देवीची पूजा करावी. निरोगी भवितव्याची प्रार्थना करावी.''