Corona virus : पिंपरी चिंचवडकरांनो काळजी घ्या; प्रतिबंधित क्षेत्रातून बाहेर पडण्यास व फिरण्याला मनाई कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 03:34 PM2020-08-01T15:34:10+5:302020-08-01T15:36:18+5:30
दिवसेंदिवस पिंपरी चिंचवड शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे.
पिंपरी : औद्योगिक शहरातील वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी पालिका व आरोग्य प्रशासन सतत कार्यरत आहे. दुसरीकडे पोलिसांनी प्रतिबंधित क्षेत्रातील नियम अधिक कडक केले आहेत. १ ते १५ आॅगस्ट रात्री बारा वाजेपर्यंत शहरातील प्रतिबंधित क्षेत्रातील जमावबंदी, वाहतूक व संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे. यासंबंधीचे अधिकृत आदेश पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी काढले आहेत.
प्रतिबंधित क्षेत्रात अत्यावश्यक सेवा वगळता इतर अन्य कुठल्याही कारणांसाठी नागरिकांना बाहेर पडता येणार नसल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
लॉकडाऊन आदेशाची मुदत ३१ आॅगस्टपर्यंत वाढविण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे. दिवसेंदिवस पिंपरी चिंचवड शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहेत. मात्र अद्याप त्याला मोठ्या प्रमाणावर यश मिळत नसल्याने नियमांची कडक अंमलबजावणी केली जात आहे. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये नागरिकांना व वाहनांना प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. तसेच त्या परिसरातून बाहेर पडण्यास मनाई आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणत्याही कारणासाठी नागरिकांना बाहेर पडता येणार नसल्याच्या सुचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. या आदेशातून कोरोना विषाणु प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काम करणारे पिंपरी चिंचवड महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी, अत्यावश्यक सेवा देणारी वाहने, यांना वगळण्यात आले आहे. तसेच प्रतिबंधित क्षेत्रातील पालिकेव्दारे चालविण्यात येणारी अथवा परवानगी दिलेली ‘फिव्हर क्लिनिक’ वगळता अन्य बाह्य रुग्ण विभाग खासगी वैद्यकीय दवाखाने सुरु ठेवण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांच्या बँकिंग सुविधांसाठी सर्व बँकांनी शाखा कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी दहा ते दुपारी दोन यावेळेत सुरु ठेवाव्यात. तसेच एटीएम केंद्रे पूर्ण वेळ कार्यान्वित ठेवावीत. या भागात सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत नागरिकांसाठी दुध, भाजीपाला, फळे, यांची विक्री सुरु राहणार आहे. यावेळी जमावबंदीचा आदेश सर्व नागरिकांना लागु राहणार आहे. त्यामुळे सार्वजनिक अथवा खासगी जागेत पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तिंना एकत्र येण्यास थांबण्यास, चर्चा करण्यास मनाई करण्यात आली आहे.
* पोलीस प्रशासनाकडून लागु करण्यात आलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्तीवर भारतीय दंड विधान संहिता कलम १८८ प्रमाणे व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ५१ ते ६० नुसार आणि साथीचे रोग कायदा १८९७ तसेच प्रचलित कायद्यातील तरतुदींनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
-