‘सारथी’वरील तक्रारींची दखल घ्या, नागरिकांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 01:44 AM2018-08-27T01:44:50+5:302018-08-27T01:45:12+5:30
महापालिका : मानवी हक्क संरक्षण, जनजागृती संस्थेतर्फे मागणी
पिंपळे गुरव : महापालिकेच्या सारथी हेल्पलाइनवरील तक्रारींना प्राधान्य दिले जात नाही. त्यामुळे अनेक नागरी सुविधांची येथे कमतरता आहे. नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा होत नसल्याने तक्रारींत वाढ होत आहे. तक्रारींचा निपटारा त्वरित करावा, अशी मागणी मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्थेने केली आहे. संस्थेचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे ही मागणी करण्यात आली आहे.
महापालिकेच्या ‘सारथी’ हेल्पलाइनच्या माध्यमातून नागरिकांनी दोन लाख पंधरा हजार तक्रारी केल्या होत्या. त्यांपैकी २१२० तक्रारी प्रलंबित आहेत. जानेवारी २०१७ पासून आॅगस्ट २०१८ पर्यंत शासकीय पोर्टल, एसएमएस सारथी हेल्पलाइन, सोशल मीडिया, मोबाईल अॅप यांसारख्या माध्यमातून तक्रारी आलेल्या आहेत. तक्रारींचा पूर्ण निपटारा होत नाही. आयुक्तांना याबाबत निवेदन दिले आहे. संस्थेचे शहर उपाध्यक्ष विकास शहाणे, मुरलीधर दळवी, संगीता जोगदंड, अरुण मुसळे, अॅड. सचिन काळे यांची या निवेदनावर स्वाक्षरी आहे.
नागरी समस्यांमुळे शहराची पिछाडी
विविध नागरी समस्यांमुळे पिंपरी-चिंचवड शहरातील सुविधांवर परिणाम झाला. त्यामुळे राहण्यायोग्य शहरांच्या सर्वेक्षणात पिंपरी-चिंचवडची पिछाडी झाली. या सर्वेक्षणात शहराला ६९ क्रमांक मिळाला आहे. या सर्वेक्षणात पुणे अव्वलस्थानी आहे. स्वच्छतेच्या बाबतीत पुणे महापालिकेने अनेक उपाययोजना केल्या आहेत. महापालिका आयुक्त कर्मचाऱ्यांना सुधारणा करण्यास सांगतात. मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही.