थंडीत घ्या आरोग्याची काळजी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2019 12:07 AM2019-01-10T00:07:04+5:302019-01-10T00:07:29+5:30
तज्ज्ञांचा सल्ला : रुग्णालयांमध्ये वाढतेय रुग्णांची संख्या
पिंपरी : शहरात सकाळी थंडी, दुपारी कडक उष्णता व रात्री पुन्हा थंडी, असे वातावरण तयार झाले आहे. या वातावरणाचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्यांमध्ये थंडीचे प्रमाण वाढले असल्याने शहरामधील रुग्णालयांमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे. कडाक्याच्या थंडीमध्ये आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
वायसीएममधील वैद्यकीय उपाधीक्षक डॉ. शंकर जाधव म्हणाले, सध्या कडाक्याची थंडी आहे. त्यातच हवामान कोरडे असल्याने धुळीचा त्रासही नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे सर्दी, खोकला, घसा दुखणे यांच्या तक्रारी वाढल्या आहेत. दमा असणाऱ्या रुग्णांचा त्रास वाढला आहे. थंडीमधील अतिसार, श्वसनविकार, थंडीताप, विषाणूजन्य ताप, दमा, कोरडा खोकला येणे असे रुग्ण सध्या आढळतात. इतर ऋतुंच्या तुलनेत थंडी हा ऋतू आरोग्याच्या दृष्टीने सर्वांत उत्तम आहे.
या खाद्यपदार्थांमधून मिळेल प्रतिकार शक्ती
बाजरी, ज्वारी, मका, जवळी, रागी (फिंगर मिलेट) ही काही सामान्य प्रकारचे अन्नधान्ये आहेत जी आपल्या आहारामध्ये समाविष्ट केली जाऊ शकतात.
गाजर, कांदे, पालक, हिरव्या बीन्स या जाती आहेत ज्यामुळे हिवाळ्यात निरोगी आणि उबदार राहण्यास मदत होते. यामध्ये बीटा-कॅरोटीन आणि व्हिटॅमिन ‘सी’ सारख्या पौष्टिक स्रोतांचा समावेश आहे.
तुलसी (तुळस) आणि आले याचा चहामध्ये वापर केल्यास शरीरामध्ये उष्णता निर्माण होते. तुलसीमध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-बायोटिक आणि अँटी-व्हायरल गुणधर्म आहेत जे शरीराला निरोगी ठेवण्यात मदत करतात. आपण केवळ आपल्या चहामध्ये नव्हे तर आपल्या सॅलड्स आणि डिप्समध्ये ही बहुमुखी औषधी वनस्पती जोडू शकता.
थंडीच्या काळात पौष्टिक खाद्य, सुकामेवा, फळांचा आहार घेणे फायदेशीर ठरते. याशिवाय थंडीच्या दिवसांमध्ये प्रत्येकाने व्यायाम करावा. विषाणूजन्य आजार पसरण्याची शक्यता जास्त असल्याने रुग्णांनी गर्दीत जाणे टाळावे. तसेच, सार्वजनिक ठिकाणी जाणे आवश्यक असेल तर रुग्णांनी तोंडाला रुमाल बांधावा. थंडीच्या काळात हळद-दूध, कॉफी, तुळशीचा चहा यांचे सेवन करावे. शिळे अन्नपदार्थ, उघड्यावरील पदार्थ, दही, लस्सी, थंडपेय टाळावेत. - डॉ. शंकर जाधव