मतदानात सहभाग घेत विकासासाठी पुढे या
By admin | Published: January 23, 2017 02:59 AM2017-01-23T02:59:29+5:302017-01-23T02:59:29+5:30
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानासाठी उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा व शहराच्या विकासासाठी पुढे यावे, असे आवाहन
पिंपरी : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानासाठी उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा व शहराच्या विकासासाठी पुढे यावे, असे आवाहन आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केले.
रोटरी क्लब आॅफ चिंचवड मोरया व महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने भक्ती-शक्ती चौक, निगडी येथे सायकल डे निमित्त आयोजित केलेल्या सायकलिंग रॅलीचे उद्घाटन रविवारी त्यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी सहायक आयुक्त अण्णा बोदडे, रोटरी क्लबचे अध्यक्ष विलासराव भोसले, सचिव कल्याणी कुलकर्णी, साहेबराव नाईक पवार, मेदनकर, तळेगाव विभागाचे विलास काळोखे, दादा हुरे, आकुर्डी विभागाचे विजय तारक, संतोष अगरवाल, भारत पेट्रोलियमचे विभागीय व्यवस्थापक पवनकुमार, उपअभियंता बापू गायकवाड, अनिल शिंदे, सुनील पवार, रोटरी क्लबचे पदाधिकारी आदींसह शहरातील प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.
आयुक्त वाघमारे म्हणाले, ‘‘येत्या २१ फेब्रुवारी २०१७ रोजी महानगरपालिका निवडणूक होत आहे. रॅलीमध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी मतदान करण्याबाबत नागरिकांचे प्रबोधन करावे. महापालिकेमध्ये चांगले प्रतिनिधी निवडून दिल्यास शहराचा विकास होण्यास मदत होईल. याबाबत सर्वांनी सजग राहून महापालिकेस सहकार्य करावे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी रोटरी क्लबने सायकलिंग रॅली हा स्तुत्य उपक्रम राबवून चांगला संदेश दिला आहे.’’
सुमारे चार कि.मी. अंतराच्या सायकल रॅलीची सुरुवात सकाळी आठला भक्ती-शक्ती चौकातून आयुक्त वाघमारे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून झाली. सायकल डेच्या निमित्ताने रोटरी क्लबने लकी ड्रॉ पद्धतीने धवल देशमुख, सिद्धेश सुभेदार, गायत्री वाघोडे या तीन विद्यार्थ्यांना आयुक्त वाघमारे व क्लबचे अध्यक्ष भोसले यांच्या हस्ते सायकलींचे वाटप करण्यात आले. हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग असलेल्या या रॅलीमध्ये मतदार व मतदान जनजागृती पत्रके माहिती व जनसंपर्क कक्षाच्या वतीने वाटप करण्यात आली. क्लबचे अध्यक्ष भोसले यांनी प्रास्ताविक केले. सचिव कुलकर्णी यांनी आभार
मानले. (प्रतिनिधी)