Pimpri Chinchwad : तळवडेतील फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, सहा महिला ठार; मालकासह दहा महिला कामगार जखमी

By नारायण बडगुजर | Published: December 8, 2023 04:20 PM2023-12-08T16:20:42+5:302023-12-08T16:20:54+5:30

पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाच्या ५ फायरगाड्या घटनास्थळी दाखल झाल्याचा माहिती आहे...

talawade MIDC Godown fire seven killed pimpri chinchwad fire pune latest news | Pimpri Chinchwad : तळवडेतील फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, सहा महिला ठार; मालकासह दहा महिला कामगार जखमी

Pimpri Chinchwad : तळवडेतील फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, सहा महिला ठार; मालकासह दहा महिला कामगार जखमी

पिंपरी - वाढदिवसाच्या केकवर लावण्यात येणाऱ्या शोभेच्या फटाक्यांच्या (फायर क्रॅकर) कारखान्यात स्फोट झाल्याने सहा महिला कामगारांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. यात कारखाना मालकासह १० महिला जखमी झाल्या असून, काहीजण गंभीर आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील तळवडे येथील जोतिबानगरात शुक्रवारी (दि. ८) दुपारी पावणेतीनच्या सुमारास ही दुर्घटना घडली. स्फोटामागील आगीचे कारण समजू शकले नाही.

मृत्यू झालेल्या महिलांची ओळख पटवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते, तर अपेक्षा तोरणे (वय २६), प्रियंका यादव (३२), कविता राठोड (४५), राधा ऊर्फ सुमन राठोड (४०), उषा पाडवी (४०), रेणुका ताथवडे (२०), कोमल चौरे (२५), शिल्पा राठोड (३१), प्रतीक्षा तोरणे (१६) आणि कारखाना मालक शरद सुतार (४५, सर्व रा. तळवडे) अशी जखमींची नावे आहेत.

तळवडेतील ‘राणा इंजिनिअरिंग’ या फॅब्रिकेशन शाॅपच्या परिसरात मोठ्या शेडमध्ये फायर क्रॅकर बनवण्याचा अनधिकृत कारखाना आहे. येथे पंधरा ते वीस महिला सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत फटाका बनविण्याचे काम करीत होत्या. दुपारी तेथे अचानक आग लागून स्फोट झाला. फायर क्रॅकरचे साहित्य आणि दारूने पेट घेतला. कारखान्यास एकच दरवाजा असल्याने महिलांना बाहेर पडता आले नाही. स्फोटात सहा महिलांचा होरपळून जागीच मृत्यू झाला, तर इतर दहा महिला आणि कारखानामालक जखमी झाला.

स्फोटाचा आवाज होताच आजूबाजूचे लोक धावत आले. त्यांनी कळवल्यानंतर अग्निशामक दलाच्या गाड्या आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवून जखमींना तसेच मृतांना बाहेर काढले. सर्वांना तत्काळ महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करून जखमींना पुण्याच्या ससून रुग्णालयात पाठविण्यात आले. जखमींमध्ये काही गंभीर असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

मृतांची ओळख पटविण्यात अडचणी -
फटाक्याच्या दारूमुळे मृतांचे चेहरे, कपडे पूर्णपणे जळून खाक झाले. त्यामुळे मृतांची ओळख पटविण्यात अडचणी येत होत्या. शरीराचा कोळसा झाल्यामुळे नातेवाईकांनाही ओळख पटत नव्हती.

‘रेडझोन’मध्ये अनधिकृत उद्योग -
संरक्षण विभागाच्या दारूगोळा कारखान्यामुळे तळवडे परिसर ‘रेडझोन’मध्ये आहे. त्यामुळे येथे बांधकाम किंवा कोणत्याही प्रकल्पास परवानगी देण्यात येत नाही. असे असतानाही अनेक अनधिकृत शेड आणि बांधकामांची उभारणी झाली आहे. हा शोभेच्या फटाक्यांचा कारखाना बिनदिक्कत सुरू होता. याबाबत प्रशासनाला माहिती नसल्याचे दिसून येते.

मुख्यमंत्र्यांकडून दुर्घटनेबाबत शोक व्यक्त, मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची आर्थिक मदत -
या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त करून मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. दुर्घटनेतील जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

Web Title: talawade MIDC Godown fire seven killed pimpri chinchwad fire pune latest news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.