तळेगाव दाभाडे आगार : एसटी महामंडळाला १६० कोटींचा तोटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 01:43 AM2018-07-13T01:43:40+5:302018-07-13T01:43:56+5:30
पोलिसांच्या आशीर्वादाने चालणारी अवैध वाहतूक, तालुक्यातील रस्त्यांची झालेली चाळण यासह विविध कारणांमुळे गेल्या ५३ वर्षांत तोटा वाढत गेला असल्याने तळेगाव एसटी आगाराला आत्तापर्यंत १६० कोटींचा तोटा झाला आहे.
वडगाव मावळ - पोलिसांच्या आशीर्वादाने चालणारी अवैध वाहतूक, तालुक्यातील रस्त्यांची झालेली चाळण यासह विविध कारणांमुळे गेल्या ५३ वर्षांत तोटा वाढत गेला असल्याने तळेगाव एसटी आगाराला आत्तापर्यंत १६० कोटींचा तोटा झाला आहे.
या आगाराची स्थापना १९६३ मध्ये झाली. ४७ बस असून, २४० कामगार आहेत. आगाराच्या परीक्षेत्रात पिंपरी-चिंचवड ते खंडाळा अशा पूर्व, पश्चिम भागात मुळशी ते खांडी कुसूर तसेच डोंगरी भागातील गावे, वाड्या आहेत. परिसरात यापूर्वी प्रवासासाठी एसटी बस हे एकमेव साधन होते. त्यामुळे तोटा होत नव्हता. परंतु कालांतराने अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू झाली. खराब रस्त्यांमुळे बसचे नुकसान होऊ लागले. डिझेलच्या व स्पेअर पार्टच्या किमतीत वाढ झाल्यामुळे तोटा वाढत गेल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
आगार व्यवस्थापक वसंत आरगडे म्हणाले की, गाव तेथे एसटी ही योजना मावळात लागू होती. परंतु अवैध वाहतुकीने डोके वर काढल्याने उत्पन्नावर परिणाम झाला आहे. तालुक्यात कामशेत, पवनानगर, कान्हे, टाकवे, तळेगाव स्टेशन, इंदोरी, सोमाटने फाटा आदी भागांत बस उभ्या करण्यासाठी जागा नसते. बस स्थानकावर अवैध प्रवासी वाहने उभी केली जातात. बसचालकाला मारहाण, दमदाटी केली जाते. पोलीस कारवाईचे केवळ नाटक करतात. खासगी वाहनांवर कारवाई
करण्याचा अधिकार एसटीच्या अधिकाºयांना आहे. परंतु त्यापूर्वी पोलिसांनाही कल्पना देऊन सोबत न्यावे लागते. त्यामुळे पोलीसच खासगी वाहनचालकांना या बाबींची कल्पना देतात. त्यामुळे कारवाईत अडथळे येतात.
लांब पल्ल्याच्या
बसचे उत्पन्न चांगले
तुळजापूर, पंढरपूर, कºहाड, नाशिक, बीड, कोल्हापूर, शिर्डी, महाड, बोरिवली या लांबपल्ल्याच्या बस या आगारातून धावतात. त्यांचे उत्पन्न चांगले आहे. परंतु अन्य मार्गावरील उत्पन्न कमी व खर्च जास्त असल्याने तोटा वाढत चालला आहे. महिन्याला ४५ ते ६० लाख तोटा होत आहे. आत्तापर्यंत १६० कोटींच्या
घरात तोटा झाल्याची माहिती आगार व्यवस्थापक वसंत आरगडे यांनी दिली.