ताथवडे: किरकोळ कारणावरून मारहाण करून एकाचा खून
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 10:48 AM2021-11-16T10:48:08+5:302021-11-16T10:50:09+5:30
गंभीर जखमी झालेल्या मल्लिकार्जुन यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान सोमवारी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला
पिंपरी : शिवीगाळ केल्याच्या किरकोळ कारणावरून लाथा- बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यामध्ये एक जण जखमी झाला. ताथवडे येथे गुरुवारी (दि. ११) रात्री ही घटना घडली. जखमी व्यक्तीचा सोमवारी (दि. १५) सायंकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
मल्लिकार्जुन उर्फ मल्लू अवधूत पतडे (वय ४९, रा. ताथवडे गाव, पुणे), असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्यांची मुलगी लक्ष्मी मल्लिकार्जुन पतडे (वय २०) यांनी वाकड पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. १५) फिर्याद दिली. त्यानुसार, ऋषीकेश चपाले, महेश पवार (दोघे रा. ताथवडे), पवन सिंग (रा. पुनावळे) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडील मल्लिकार्जुन पतडे हे गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास ताथवडे चौकात खरेदीसाठी गेले. त्यावेळी शिवीगाळ केल्याच्या किरकोळ कारणावरून आरोपींनी आपसात संगणमत करून मल्लिकार्जुन यांना पोटात लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मल्लिकार्जुन यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान सोमवारी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला.