पिंपरी महापालिकेतर्फे कर सवलत योजना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 07:19 PM2019-04-16T19:19:35+5:302019-04-16T19:23:05+5:30
आर्थिक वर्षामध्ये थकबाकीसह संपूर्ण बिलाची रक्कम एक रकमी आगाऊ भरणा करणा-या मिळकतधारकांना चालू मागणीतील सामान्य करामध्ये सवलत देणार आहे.
पिंपरी: महानगरपालिकेच्या करसंकलन विभागामार्फत नवीन आर्थिक वर्षांत ३० जूनपूर्वी थकबाकीसह संपूर्ण बिलाची रक्कम भरणाऱ्यांना सवलत योजना जाहीर केली आहे. महिला, सैनिक आणि अपंगांनाही योजना जाहीर केली आहे. नियमितपणे कर भरणाऱ्यांनाही सवलत देण्यात येणार आहे.
महापालिकेतर्फे आगाऊ कर भरणाऱ्यांसाठी कर सवलत दिली जाते. सामान्य करातील विविध सवलत योजनांची अंमलबजावणी करण्यात येते. अशी माहिती सहायक आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी दिली. आष्टीकर म्हणाले, आर्थिक वर्षामध्ये थकबाकीसह संपूर्ण बिलाची रक्कम आगाऊ भरणा करणा-या मिळकतधारकांना चालू मागणीतील सामान्य करामध्ये सवलत देणार आहे. माजी सैनिक व स्वातंत्र्य सैनिक किंवा त्यांचे पत्नी यांचे स्वत: राहत असलेल्या फक्त एका निवासी घरास सामान्य करात पन्नास टक्के, महिलांचे नावे असलेल्या, स्वत: राहत असलेल्या फक्त एका निवासी घरास सामान्य करात सुट पन्नास टक्के सवलत,अंपगत्व असणा-या दिव्यांग व्यक्तीचे नावावर असणा-या मिळकतीस पन्नास टक्के , ग्रीन बिल्डींग रेटींग सिस्टीम राबविणा-या मिळकतीस पंधरा टक्के, थकबाकीसह मिळकत कर बिलाची रक्कम आगाऊ रक्कम भरल्यास, स्वतंत्र नोंद असलेल्या निवासी मिळकतीस दहा टक्के, बिगरनिवासी, मिश्र, औद्योगिक मोकळ्या जमिनींना पाच टक्के, संरक्षण दलातील शौर्य पदक धारक आणि माजी सैनिकांच्या विधवा यांच्या नावे मालमत्तांना शंभर टक्के, संरक्षण दलातील अविवाहित शहिद झालेल्या सैनिकांच्या नामनिर्देशित मालमत्तांना करात शंभर टक्के सुट देण्यात येणार आहे. तीस जूनपर्यंत मिळकत कराची थकबाकीसह दोन्ही सहामाहीचे संपूर्ण बिलांची रक्कम एक रक्कमी भरणा करणा-यांना या योजनेचा लाभ होणार आहे. वरील सवलत योजनांपैकी एका योजनेचा लाभ घेता येणार आहे. तसेच डिजीटल व्यवहारांना चालना मिळावी, कराचा ऑनलाईन भरणा केल्यास सामान्य करात पाच टक्के सवलत देण्यात येणार आहे. मिळकतधारकांना सर्व सोळा करसंकलन विभागीय कार्यालये, महानगरपालिकेची आठ क्षेत्रिय कार्यालयांपैकी कोणत्याही कार्यालयामध्ये सार्वजनिक व साप्ताहिक सुट्टीचे दिवस वगळुन सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत कर भरणा करता येणार आहे. तसेच संकेतस्थळावर ऑनलाईन पेमेंट गेट-वे द्वारे मिळकतकराचा भरणा करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे.