'महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना दिल्लीचे शिक्षक देणार धडे'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2018 07:32 PM2018-10-14T19:32:01+5:302018-10-14T19:36:19+5:30
महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी दिल्लीतील शिक्षकांना बोलविण्यात येणार आहे. पिंपरी महापालिकेच्या शिक्षकांना प्रशिक्षणसाठी दिल्लीत पाठविले जाईल. तसेच शिक्षकांचा वर्ग घेण्यात येणार आहे.
पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी दिल्लीतीलशिक्षकांना बोलविण्यात येणार आहे. पिंपरी महापालिकेच्या शिक्षकांना प्रशिक्षणसाठी दिल्लीत पाठविले जाईल. तसेच शिक्षकांचा वर्ग घेण्यात येणार आहे. शिक्षकांची नकारात्मक भूमिका असल्यामुळे शिक्षण क्षेत्रात पालिकेच्या शाळा मागे राहिल्याआहेत. त्यामुळे शिक्षकांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे, असे महापौर राहुल जाधव म्हणाले. तसेच दिल्ली महापालिका आणि पिंपरी महापालिकेमध्ये शैक्षणिक करार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पदाधिकारी आणि अधिका-यांनी दिल्लीतील शाळा पाहणी दौरा केला. त्यानंतर पाहणी दौ-याची पदाधिका-यांनी माहिती दिली. महापौर जाधव, सभागृह नेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसेचे सचिन चिखले उपस्थित होते.
महापाैर म्हणाले, 'दिल्ली महापालिका शाळांना ज्या सुविधा देते, त्याच सुविधा पिंपरी महापालिका देखील शाळांना देत आहे. दिल्लीतील शिक्षकांची मानसिकता सकारात्मक आहे. पिंपरी पालिकेच्या शिक्षकांची मानसिकता नकारात्मत असून त्यांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. त्यासाठी कार्यशाळा घेण्यात येईल. शाळांचा गुणवत्ता, दर्जा सुधारण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. सर्व शिक्षकांना सोयी-सुविधा दिल्या जातील. स्मार्ट सिटीत सहा शाळांचा समावेश केला होता. त्यामध्ये आणखीन चार शाळांचा समावेश करुन दहा शाळांची पहिल्या टप्यात सुधारणा केली जाणार आहे. त्यानंतर टप्प्या-टप्यात उर्वरित शाळा सुधारण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत'.