पहिलीच्या वर्गात शिक्षकांची ‘फ्री स्टाईल’ हाणामारी; गुरुजींकडून विद्यार्थ्यांनी काय बोध घ्यायचा?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2022 12:03 PM2022-10-19T12:03:36+5:302022-10-19T12:03:44+5:30
महापालिकेच्या शिक्षकांमध्येही दिवसेंदिवस अहंकार वाढत असल्याच्या तक्रारी पालकही करत आहे
पिंपरी : शाळेतील पहिलीच्या वर्गामध्ये शिक्षक शिकवत असतानाच दुसऱ्या शिक्षकाने तिथे जात “माझ्याबद्दल बाहेर काय सांगतोस?” असे म्हणत दमदाटी करण्यास सुरुवात केली. त्याचे रुपांतर चक्क हाणामारीमध्ये झाले. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रहाटणी परिसरातील शाळेमध्ये सोमवारी सकाळी हा प्रकार घडला. दोन्ही शिक्षक महापालिकेचे कर्मचारी आहेत. मात्र, गुरुजींचे ज्ञानदानाचे काम सोडून ते हाणामारीवर आल्याने शिक्षकांकडून विद्यार्थ्यांनी काय बोध घ्यायचा अशा प्रश्न पालकांना पडला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षकांच्या चार संघटना आहेत. नुकतेच एका संघटनेतील शिक्षण सेवकांना कायम केले आहे. सोमवारी सकाळी शाळेतील पहिलीच्या वर्गामध्ये शिक्षक शिकवत होते. त्यावेळी त्याठिकाणी दुसरे शिक्षक आले. त्यांनी तुम्ही माझ्याबाबतीत बाहेर काहीही सांगत आहे, असे म्हणत दमदाटी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दुसऱ्या शिक्षकांच्या रागाचा पारा चढला. दोघांमध्ये त्यावरून कडाक्याचे भांडण सुरू झाले. ते इतके टोकाला गेले की शेवटी त्याचे रूपांतर हाणामारीमध्ये झाले. विशेष म्हणजे यामधील एका शिक्षकाची सहा वर्षांची मुलगीदेखील शिक्षण घेत आहे. तिच्यासमोरच हा सगळा प्रकार घडला.
ज्या बालवयामध्ये शिक्षकांकडून शिक्षणाचे बाळकडू घ्यायचे, त्याच वयामध्ये शिक्षकच हाणामारी करत असल्याने महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महापालिकेच्या शिक्षकांमध्येही दिवसेंदिवस अहंकार वाढत असल्याच्या तक्रारी पालकही करत आहे. शिक्षकांच्या ‘फ्री स्टाईल’ हाणामारीने त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे तर शिक्षकांच्या अनेक संघटना असल्याने शिक्षक शिकवणीपेक्षा जास्त वेळ राजकारण करण्यामध्ये घालवत असल्याच्या तक्रारीही पालक करत आहे. त्यामुळे अशा पद्धतीने हाणामारी करणाऱ्या शिक्षकांवर आयुक्त कारवाई करणार का? याबाबत शहरामध्ये चर्चा रंगली आहे.
''मुख्याध्यापकांची याबाबत तक्रार आली नाही. तक्रार आल्यानंतर त्यांची चौकशी करून दोषी असलेल्या शिक्षकांवर कारवाई करण्यात येईल. - संदीप खोत, उपायुक्त, शिक्षण विभाग.''