हीच वारीची शिकवण अन् मोठंपण ! संत तुकाराम महाराजांच्या पालखी रथाला मुस्लीम कारागिरांनी दिली चकाकी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2021 02:27 PM2021-06-26T14:27:35+5:302021-06-26T14:29:15+5:30
मुस्लिम कारागिरांनी पालखी रथाला सेवाभावी वृत्तीने दिली चकाकी; काम करणाऱ्या कारागिरांनी सांगितलं यामागचं 'हे'कारण..
देहूगाव: आषाढी वारीच्या श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने १ जुलै रोजी दुपारी दोन वाजता पालखी प्रस्थान सोहळा असल्याने प्रस्थान सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. याही वर्षी पालखी रथामध्ये जाणार नसली तरी मंदिराच्या आवारात श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका पालखीमध्ये ठेवून प्रदक्षिणा घालण्यात येणार असल्याने सालाबादप्रमाणे पालखी आणि रथाला चकाकी देण्याचे काम आज (दि.२६ ) सुरू करण्यात आले आहे.
पालखी रथाबरोबरच पालखी व पादुकांच्या बरोबर या सोहळ्याबरोबर नेण्यात येत असलेली आभुषणे, अब्दागिरी, चौपदाराचे दंड, गरूड टक्के, समया, विठ्ठल रुक्मिनी मंदिरातील महिरप नव्याने करण्यात येत आहे. मंदिरातील चौकटी, दरवाजे, अभिषेकाचे व पूजेचे थाळ, चौरंग, पाट यांची पिंपरी येथील घनशाम ज्वेलर्स यांच्यावतीने ८ कारागिरांच्या मदतीने चकाकी देण्याचे काम केले आहे.हे त्यांचे ६ वर्षे असून हे काम विनामूल्य सेवाभावी वृत्तीने करतात. पालखी व पालखी रथाला चकाकी देण्यासाठी यंदाही स्वयंचलित तांब्याच्या तारा असलेला ब्रश वापरण्यात आल्याची माहिती कुशल वर्मा यांनी दिली. यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सॅन्टायझर आणि फिजिकल डिस्टंन्सचे पालन करीत सर्व कर्मचाऱ्यांनी चकाकी देण्याचे काम पुर्ण केले. यासाठी १५ लिटर लिंबू चिंचपाणी, रिठा आणि काही चकाकी देण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या रसायनांचा वापर करत दोन यांत्रिकी ब्रश, कापड आदी साहित्याचा वापर करण्यात आला.
या वेळी पालखी सोहळ्याचे प्रमुख अजित महाराज मोरे, संजय महाराज मोरे, भानूदास महाराज मोरे, संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, विश्वस्थ विशाल महाराज मोरे, संतोष महाराज मोरे व माणिक महाराज मोरे पालखी सोहळ्याचे प्रमुख चोपदार निवृत्ती गिराम आदी उपस्थित होते.
यंदा पालखी सोहळा नेहमीप्रमाणे होणार नसल्याने पालखी रथ खडकी येथील ५१२ वर्कशॉप मध्ये न नेता त्याची देखभाल व दुरूस्ती जागेवरच यापूर्वीच करण्यात आली आहे. पालखीला चकाकी देण्यासाठी पारंपारिक पद्धतीने रिठे, लिंबू आणि चिंच यांचा रस काढून त्याचे मिश्रण तयार करण्यात आले. हे मिश्रण वापरून चकाकी देण्याचे काम करण्यात आले.
यासाठी कुशल वर्मा यांच्या देखरेख व शोएब शेख यांच्या मार्गदर्शनाने सुनील दीक्षित आरिफ मोमीन, अरबाज शेख, शहनवाझ खान, यांनी सेवा भावी वृत्तीने चकाकी देण्याचे काम केले.