सांगा, शाळेत आम्ही खेळायचं कुठं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 01:38 AM2018-10-26T01:38:17+5:302018-10-26T01:38:27+5:30

महापालिकेच्या ३० शाळांना खेळाची मैदाने नाहीत. त्यामुळे मुलांनी खेळायचे कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

 Tell us where to play in school? | सांगा, शाळेत आम्ही खेळायचं कुठं?

सांगा, शाळेत आम्ही खेळायचं कुठं?

googlenewsNext

पिंपरी : महापालिकेच्या ३० शाळांना खेळाची मैदाने नाहीत. त्यामुळे मुलांनी खेळायचे कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या काही वर्षांपासून या शाळांमध्ये पीटी शिक्षकांचीही भरती करण्यात आलेली नाही. परिणामी महापालिकेच्या शाळेतून चांगले खेळाडू घडण्यास अडथळा होत आहे.
अनेक शाळा भौतिक सोयीसुविधांपासून वंचित आहेत. अनेक शाळांना संरक्षक भिंत नाही. मैदाने नसल्याने विद्यार्थ्यांची खेळण्यासाठी कुचंबणा होत आहे. केंद्र सरकारकडून खेळासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. त्याचबरोबर मिशन आॅलिम्पिक २०२४ साठी ७५० मुलांची निवड करण्यात आली आहे. प्रत्येक खेळाडूवर प्रत्येक वर्षी १० लाख रुपये एवढा खर्च करण्यात येतो. एवढा खर्च शासन खेळाडूंवर करीत असताना आपल्या शहरातील प्राथमिक शाळेत खेळासाठी क्रीडांगणे नसणे ही बाब गंभीर आहे.
शहरातील अनेक खेळाडू विभागीय, राज्य तसेच राष्ट्रीयस्तरावर चमकले आहेत. मात्र ही संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकी आहे. आपल्याकडील विद्यार्थ्यांमध्ये चांगले खेळाडू होण्याची क्षमता असूनही केवळ क्रीडांगणे नसल्याने विद्यार्थ्यांना आवड असूनही खेळाचा सराव करता येत नाही. त्यात भर पीटी शिक्षक नसल्याने अजूनच खेळाकडे दुर्लक्ष केले जात आहे. महापालिका शाळेतील मुलांना खेळासाठी मैदाने उपलब्ध झाली तर ते नक्कीच चांगली प्रगती करतील. याचा विचार करून महापालिका शिक्षण विभागाने मुलांना खेळासाठी मैदाने उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे.
>पालकांमध्ये नाराजी
महापालिका शाळांच्या एकूण ८४ इमारती आहेत. या इमारतीमधील ५४ इमारतींना सध्या क्रीडांगण उपलब्ध आहे. तर ३० इमारतींना क्रीडांगण नसल्याचे समोर आले आहे. मैदान उपलब्ध नसल्याने मुलांना खेळाचा सराव करता येत नाही. खेळातील नैपुण्य दाखविण्यासाठी खेळाडूंना वाव मिळत नसल्याने विद्यार्थी व पालकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. एकीकडे शासन शालेय जीवनातून खेळाडू घडावेत यासाठी प्रयत्न करत आहे. यासाठी विविध स्पर्धा घेत असताना शाळांना खेळाचे मैदानच नसल्याने खेळाडू घडणार कसे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
>शिक्षण समितीच्या वतीने शाळांची पाहणी सुरू आहे. मुलांच्या जीवनामध्ये खेळाचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. जागा उपलब्ध नसल्याने मैदानांची गैरसोय होत आहे. मात्र ज्या शाळांमध्ये क्रीडांगणे नाहीत अशा शाळांना पर्यायी व्यवस्था केली जाणार आहे. त्याचप्रमाणे पीटी क्षिक्षकांची लवकरच नियुक्ती केली जाणार आहे.
- सोनाली गव्हाणे, सभापती शिक्षण समिती, पिं. चिं. महापालिका.

Web Title:  Tell us where to play in school?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.