वृक्षतोडीने वाढले तापमान
By Admin | Published: April 10, 2017 02:34 AM2017-04-10T02:34:09+5:302017-04-10T02:34:09+5:30
गेले अनेक दिवस शहर, जिल्ह्याच्या वातावरणामध्ये उष्णतेचे प्रमाण वाढत चालले आहे. पाच वर्षांपूर्वी
रावेत : गेले अनेक दिवस शहर, जिल्ह्याच्या वातावरणामध्ये उष्णतेचे प्रमाण वाढत चालले आहे. पाच वर्षांपूर्वी शहराचे तापमान मार्चअखेरीस ३५ अंशांच्या जवळपास स्थिर असायचे. परंतु वाढते शहरीकरण व वृक्षतोडीमुळे तापमानात वाढ होत असून, ही चिंताजनक बाब आहे.
पिंपरी-चिंचवड शहर, पुणे शहर आणि आजूबाजूची उपनगरे आणि जिल्ह्याचा ग्रामीण भाग यांचे २०१२ नंतर मोठा प्रमाणात विस्तारीकरण होत गेले. चाकण, रांजणगाव,
शिरूर, तळेगाव, पिंपरी-चिंचवड, हिंजवडी अशा चारही बाजूंनी उद्योगधंद्यांचे जाळे वाढत गेले. त्याचबरोबर कार्बन उत्सर्जनाचे प्रमाणसुद्धा वाढत गेले. वाढत्या विकासाबरोबर जमिनीवर सिमेंटची जंगले उभी राहिली. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली.
मावळ-मुळशी, तसेच पश्चिम घाट परिसरामधील ३५ टक्क्यांपेक्षा जास्त हरितपट्टा नामशेष झाला आहे. हरित नियमांचे पालन न
केल्यामुळे पुढील काळामध्ये
तापमान वाढतच गेल्याची नोंद झाली. सन २०१२ ते २०१७ चा विचार केला असता, मार्चअखेर आणि एप्रिलमध्ये तापमानात एक एक अंशांनी वाढतच गेले. ३५ अंशांपर्यंत असणारे तापमान आता वाढ होत जाऊन ४० अंशांच्या आसपास पोहोचले आहे.
वाढत्या तापमानामुळे आरोग्यास धोका निर्माण झाला असून, नागरिक घराबाहेर पडणेही टाळत आहेत. या गोष्टी टाळण्यासाठी पर्यावरणाचे संतुलन राखण्याबाबत गांभीर्याने पावले उचलणे गरजेचे आहे.
दिवसेंदिवस वाढत असणारे तापमान चिंताजनक असल्याचे प्राधिकरण नागरी सुरक्षा समिती अध्यक्ष विजय पाटील, विजय मुनोत, रवी भावके, तुकाराम दहे, विजय जगताप, विद्या शिंदे आदींनी व्यक्त केली आहे. (वार्ताहर)
याकरिता काय करणे गरजेचे आहे
नगर परिषद, नगरपालिका, जिल्हा परिषद, महापालिका यांनी एकत्रितपणे संयुक्तपणे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेणे आवश्यक.
सिमेंटमुळे सर्वांत जास्त कार्बन उत्सर्जन होते. त्याकरिता ‘ग्रीन हाउस’ प्रोजेक्ट हाती घेणे आवश्यक.
शहर परिसरात, आरक्षित, मोकळ्या भूखंडांवर, रस्त्याच्या दुतर्फा, शाळा-महाविद्यालय परिसर, उद्योगनगरी परिसर, नदी पात्र परिसर अशा सर्व ठिकाणी जास्तीत जास्त झाडे लावणे आवश्यक
देशी झाडे, कमी पाण्यावर जगणारी झाडे (वड, पिंपळ, उंबर, कडुलिंब, अशोक) या झाडांचे रोपण आवश्यक
हरित क्रांती करून हरित पट्ट्यांची निर्मिती करून कार्बन डाय आॅक्साइडवर नियंत्रण ठेवू शकता येईल.
सौर ऊर्जेचा वापर जास्तीत जास्त वाढवावा
हरितपट्टा, जंगल कायदा याचे काटेकोरपणे पालन व्हावे. वृक्षतोड न करता पुनर्रोपण पद्धतीचा वापर वाढवावा.