बोपखेलला उभारणार तात्पुरता उड्डाणपूल
By admin | Published: May 26, 2017 06:15 AM2017-05-26T06:15:13+5:302017-05-26T06:15:13+5:30
बोपखेलवासीयांचा प्रश्न सुटत नसल्याने विरोधी पक्षातील नेते आक्रमक झाले. तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. त्यानंतर महापालिका प्रशासन,
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : बोपखेलवासीयांचा प्रश्न सुटत नसल्याने विरोधी पक्षातील नेते आक्रमक झाले. तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. त्यानंतर महापालिका प्रशासन, अधिकारी, पदाधिकारी, जिल्हा प्रशासन, संरक्षण विभाग अशी तातडीची बैठक झाली. तात्पुरत्या स्वरूपातील पुलास मान्यता दिल्याचे पत्र महापौरांसह सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलनकर्त्यांना दिल्यानंतर उपोषण सोडण्यात आले.
बोपखेल संघर्ष कृती समिती आणि ग्रामस्थांनी रस्त्यासाठी पिंपरीतील आंबेडकर चौकात बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. उपोषणाचा पाचवा दिवस होता. यासाठी उपस्थित सर्वपक्षीय नेत्यांनीही एकमताने लवकरच आयुक्तांची बैठक बोलावून यावर तोडगा काढावा, अशी मागणी महापौरांकडे केली होती. तसेच एक दिवसांची मुदत दिली होती. त्यामुळे महापौरांनी आज बैठक घेतली. या वेळी महापौर नितीन काळजे, पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर, लष्काराचे राजेंद्र मुठे, आमदार गौतम चाबुकस्वार, सह शहर अभियंता राजन पाटील, माजी नगरसेवक मारुती भापकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, शिवसेना शहरप्रमुख राहुल कलाटे, मनसेचे शहराध्यक्ष नगरसेवक सचिन चिखले, शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन घुले उपस्थित होते.
कायमस्वरूपी पूल होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपातील पूल उभारण्यास अनुकूलता दर्शविली. त्यानंतर आयुक्तांनी लवकरच तात्पुरता पूल बांधू असे पत्र तयार करण्यात आले. त्यानंतर महापौरांनी सायंकाळी साडेसहाला हे पत्र आंदोलनकर्ते संतोष घुले यांना दिले. या वेळी पक्षनेते, सर्व विरोधी पक्षातील नेते यांच्यासह नगरसेविका माई घुले, निर्मला गायकवाड, शिक्षण मंडळाचे उपसभापती विष्णुपंत नेवाळे, अमीत गावडे, श्याम लांडे, फजल शेख आदी उपस्थित होते. महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी बोपखेल गाव रस्ता संघर्ष समितीला पत्र दिले आहे. त्यातील मजकूर असा, बोपखेल पुलाबाबत जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. त्यात तात्पुरत्या पूल उभारण्यासंदर्भात सकारात्मकता दर्शविली आहे.