बिनव्याजी कर्जाचा मोह पडला महागात; साडेसहा लाखांना गंडा; मोशी येथील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 19:52 IST2020-11-30T19:51:26+5:302020-11-30T19:52:38+5:30
आरोपींनी संगनमत करून फिर्यादी यांना फोन करून आपण बजाज फायनान्स कंपनीच्या मुंबई कार्यालयातून बोलत असल्याचे सांगितले.

बिनव्याजी कर्जाचा मोह पडला महागात; साडेसहा लाखांना गंडा; मोशी येथील प्रकार
पिंपरी : फायनान्स कंपनीतून बोलत असल्याचे सांगून शून्य टक्के व्याजदराने १५ लाख रुपयांचे कर्ज देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर दोघांकडून सहा लाख ६७ हजार रुपये घेतले. मात्र कर्ज मंजूर केले नाही. गंधर्वनगरी मोशी येथे फेब्रुवारी २०१९ ते ८ नोव्हेंबर २०२० या कालावधीत घडला.
बापूगौडा महादेवअप्पा पोलीस पाटील (वय २६, रा. गंधर्वनगरी, मोशी) यांनी याबाबत रविवारी (दि. २९) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अली अनिस मोहम्मद मुमताज (रा. श्रीराम पाडा, भांडुप, मुंबई) आणि एका अनोळखी इसमाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
आरोपींनी संगनमत करून फिर्यादी पोलीस पाटील यांच्या मोबाईलवर फोन करून आपण बजाज फायनान्स कंपनीच्या मुंबई कार्यालयातून बोलत असल्याचे सांगितले. शून्य टक्के व्याजदराने १५ लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून देतो, असे सांगून वेगवेगळ्या कारणांसाठी फिर्यादी यांच्याकडून तीन लाख ६७ हजार रुपये आणि त्यांचे मित्र गुरुलिंगय्या स्वामी यांच्याकडून तीन लाख रुपये वेगवेगळ्या बँक खात्यावर भरण्यास सांगितले.
फिर्यादी आणि त्यांच्या मित्राने पैसे भरल्यानंतर आरोपींनी त्यांचे कर्ज मंजूर न करता तसेच खात्यावर भरलेले पैसे परत न करता विश्वासघात करून सहा लाख ६७ हजारांची आर्थिक फसवणूक केली.