कामकाजासाठी दहा समित्या
By admin | Published: January 31, 2017 04:00 AM2017-01-31T04:00:33+5:302017-01-31T04:00:33+5:30
महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना पक्षाच्या आकुर्डीतील कार्यालयातील वॉर रूम सज्ज झाले असून येथून सर्व यंत्रणा राबविली जात आहे.
पिंपरी : महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना पक्षाच्या आकुर्डीतील कार्यालयातील वॉर रूम सज्ज झाले असून येथून सर्व यंत्रणा राबविली जात आहे.
शिवसेना-भाजपाची युती तुटल्याबाबतचे गुरुवारी स्पष्ट झाल्यानंतर शिवसेनेने आनंद व्यक्त करीत तयारी सुरु केली. पक्षाचे कामकाजही सुरु झाले आहे. आकुर्डीतील खंडोबा माळ चौकातील पक्ष कार्यालयातील वॉर रुममधील कामकाजासाठी विविध प्रकारच्या दहा समित्या नेमण्यात आल्या आहेत. यामध्ये निवडणूक कार्यालय समिती, प्रसिद्धिप्रमुख समिती, सभा, रॅली परवानगी समिती, प्रचार साहित्य समिती, निवडणूक खर्च समिती, गटप्रमुख समिती या समित्यांचा समावेश आहे. या समित्यांमार्फत कामकाजाचे वाटप करण्यात आले आहे. फेसबुक, ट्विटर, व्हॉटस अॅप अशा सोशल मीडियाचा वापर करणे यांचे नियोजन केले जात आहे.
दरम्यान, पक्षाच्या प्रमुखांनी तीनही विधानसभा मतदारसंघांतील प्रभागांच्या मुलाखती घेतल्या आहेत. तसेच बूथनिहाय नियोजन कसे असावे, याचीही माहिती कार्यकर्त्यांना दिली जात आहे. सोशल मीडियाचाही वापर कसा करावा यासाठी कार्यकर्ते, उमेदवारांना माहिती दिली जात आहे. विविध विभागांच्या बैठका, निवडणुकीचे नियोजन होत आहे.
प्रभागनिहाय समन्वयक नेमण्यात आले असून, त्यांच्यामार्फत केंद्रनिहाय कामकाज पाहिले जाणार आहे. वॉर रुममध्येच अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासह इच्छुकांना मार्गदर्शनही केले जात आहे.
यासह प्रचार सभा, नेत्यांचे दौरे आदींचे नियोजन केले जात आहे. प्रत्येकाला जबाबदारी वाटून देण्यात आली आहे. पक्षाकडून विविध कार्यक्रम, तसेच नियोजनबाबत वॉररुममधून कळविले जात आहे. यासह विविध प्रकारची माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुकांसह कार्यकर्त्यांचीही या ठिकाणी गर्दी होत आहे. (प्रतिनिधी)