ताथवडे येथे आगीत दहा वाहने जळून खाक; अचानक घडलेल्या जळीतकांडामुळे परिसरात घबराट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 06:58 PM2020-05-26T18:58:45+5:302020-05-26T19:00:07+5:30
आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज
हिंजवडी : ताथवडे येथील पवार वस्तीमध्ये पहाटेच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत दहा वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. यामध्ये तिन चारचाकी आणि सात दुचाकी जळून लाखोंचे नुकसान झाले आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज हिंजवडी पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी अजित तुकाराम पवार (वय ३२, पवार वस्ती, ताथवडे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि.२६) पहाटे अडीचच्या सुमारास ताथवडे गावच्या हद्दीत, पवारवस्ती येथे घरासमोर उभ्या केलेल्या वाहनांना अज्ञात कारणाने आग लागली. आगीत तिन चारचाकी आणि सात दुचाकींचे जळून प्रचंड नुकसान झाले. आग लागल्याची माहिती मिळताच हिंजवडी एमआयडीसी विभागातील अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तत्काळ घटना स्थळी दाखल झाल्या, काही वेळातच आग आटोक्यात आणली. मात्र, तो पर्यंत वाहनांचे प्रचंड नुकसान झाले होते. आग नक्की कशामुळे लागली समजू शकले नाही .मात्र पहाटेच्या सुमारास अचानक घडलेल्या जळीतकांडामुळे ताथवडे परिसरात घबराट पसरली आहे. हिंजवडीचे पोलीस उपनिरीक्षक मिननाथ वरुडे पुढील तपास करत आहेत.