लग्नसमारंभासाठी नेत्यांची दमछाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 03:23 AM2018-05-07T03:23:12+5:302018-05-07T03:23:12+5:30
मावळ तालुक्यातील नेतेमंडळीची कार्यक्रमांसाठी दमछाक होताना दिसत आहे. तालुक्यात अनेक साखरपुडे, लग्नसमारंभ होत असून, नेते मंडळी मात्र प्रत्येक कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहत असल्याचे दिसून येत आहे.
पवनानगर : मावळ तालुक्यातील नेतेमंडळीची कार्यक्रमांसाठी दमछाक होताना दिसत आहे. तालुक्यात अनेक साखरपुडे, लग्नसमारंभ होत असून, नेते मंडळी मात्र प्रत्येक कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहत असल्याचे दिसून येत आहे.
तालुक्याचे लोकप्रतिनिधी पंचक्रोशीत आमंत्रित दशक्रिया व तेरावा विधी, विविध विकासकामांचे भूमिपूजन, साखरपुडा, लग्न, सत्यनारायण महापूजा यांचे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत रीतसर नियोजन आखून ते वेळ पाळून उपस्थिती दर्शवीत आहेत.
तर एकीकडे मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून, त्यामध्ये विविध मेजवानीचे नियोजन आखले जात आहे. त्यामध्ये तरुण कार्यकर्ते वाढदिवस साजरा करून त्यामध्ये सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करून उपस्थिती दर्शवल्याची माहिती देण्यात येत आहे. यामध्ये गल्लीतील कार्यकर्ते थेट महाराष्ट्र विधानभवनाचा आणि आपला फोटो लावतात व जिल्हा परिषद पुण्याचा फोटो वापरला जातो.
सध्या मावळ तालुक्यात जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत. वारेमाप पैसा मिळाल्याने छोटे छोटे कार्यकर्तेसुद्धा मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी करताना दिसत आहेत.
मुहूर्त कमी
या वर्षी लग्न समारंभासाठी मुहूर्त कमी असल्याने एकाच दिवशी बहुतेक लोक लग्नाची तारीख धरत आहेत. त्यामुळे त्यांची अजूनच पळापळ होते. तरीदेखील तोंड दाखवून, एक सत्कार घेऊन आशीर्वाद देत असताना दिसत आहेत. मावळ तालुक्यात पंचवीस वर्षे भाजपाची सत्ता असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाचे या तालुक्यात परिवर्तन होणार का, अपक्ष उमेदवार यामध्ये उडी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे प्रत्येक जण उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
विकासकामांचा धडाका
तसेच मावळ तालुक्यात सत्ताधारी भाजपाच्या लोकप्रतिनिधीकडून गावोगावी जाऊन विविध विकासकामाचा उद्घाटनाचा धडाका सुरू करण्यात आला असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये जास्तीत जास्त पवन मावळ, आंदर मावळ, नाणे मावळ या मावळच्या तीन ग्रामीण भागात विकासकामाच्या जिल्हा परिषद,मावळ पंचायत समितीच्या व स्थानिक आमदार फंडाच्या माध्यमातून उद्घाटनासाठी तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी धडाका लावला आहे.