‘पर्यावरणपूरक’कडे फिरविली पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 12:47 AM2018-08-30T00:47:11+5:302018-08-30T00:47:49+5:30
महापालिका : गणेशोत्सवाच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीसाठी खुर्च्या राहिल्या रिकाम्या
पिंपरी : पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महापालिकेच्या वतीने आयोजित केलेल्या बैठकीबाबत अनास्था दिसून आली. उपस्थिती कमी होती. ‘यंदाचा गणेशोत्सव हा सर्वांना एकत्र घेऊन पर्यावरणपूरक केला जाईल, तसेच गणेशोत्सवात समाजप्रबोधनपर चांगला संदेश जाईल, असे देखावे तयार करावेत, असे आवाहन महापौर राहुल जाधव यांनी केले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात साजरा होणारा गणेशोत्सव या वर्षीदेखील पर्यावरणपूरक, तसेच शांततेत व आनंदी वातावरणात पार पाडण्यासाठी सामाजिक संस्था व गणेशोत्सव मंडळांच्या अध्यक्षांसमवेत बुधवारी दुपारी तीनला बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी पक्षनेते एकनाथ पवार, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, अ प्रभागाध्यक्षा अनुराधा गोरखे, ब प्रभागाध्यक्षा करुणा चिंचवडे, फ प्रभागाध्यक्षा कमल घोलप, नगरसदस्य नामदेव ढाके, स्वीकृत सदस्य अॅड. मोरेश्वर शेडगे, नामनिर्देशित सदस्य सागर हिंगणे, दिनेश यादव, सहायक आयुक्त मंगेश चितळे, आशादेवी दुरगुडे, अण्णा बोदडे, संदीप खोत, मनोज लोणकर, श्रीनिवास दांगट, आशा राऊत, ज्येष्ठ नागरिक महासंघाचे प्रभाकर कोळी, सूर्यकांत मुथियान, पर्यावरण संवर्धन समितीचे विकास पाटील, सुभाष चव्हाण, पोलीस मित्र संघटनेचे अशोक तनपुरे, संस्कार प्रतिष्ठानाचे धनंजय सावंत, मच्छिंद्र कदम, हिंदू जनजागृती समितीचे अशोक कुलकर्णी, आंघोळीची गोळीचे सचिन काळभोर, राहुल धनवे, आझाद मित्र मंडळाचे अतुल नढे, भैरवनाथ युवक संघाचे आनंदा यादव, अखिल मंडई मित्र मंडळाचे अतुल पडवळ, श्रीकृष्ण क्रांती मित्र मंडळाचे शिवाजी सूर्यवंशी, पीसीसीएफचे हृषीकेश तपशाळकर आदी उपस्थित होते. बैठकीस ५८ जण उपस्थित होते. महापालिकेने केलेल्या आवाहनास विविध सामाजिक मंडळे, सामाजिक संस्थांनी प्रतिसाद कमी दिल्याचे दिसून आले.
गणेशोत्सवासाठी रासायनिक रंगाऐवजी नैसर्गिक रंगांनी बनविलेल्या शाडू मातीच्या किंवा कागदी लगद्यापासून बनविलेल्या मूर्तींना प्राधान्य द्यावे. महोत्सवादरम्यान गुलाल अथवा अन्य रंगांचा वापर करू नये. मूर्ती शक्यतो लहान आकाराची ठेवावी. प्लॅस्टिक व थर्माकोलचा वापर करू नये. रोषणाई व ध्वनिक्षेपणाचा वापर मर्यादित ठेवावा. निर्माल्य व पूजा साहित्य नदीपात्रात न टाकता निर्माल्य कुंडातच टाकावे, नदीचे पाणी प्रदूषित न करण्याबाबत सहकार्य करावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी केले. या वेळी उपस्थित असलेल्या विविध स्वयंसेवी सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत सूचना मांडल्या. बैठकीचे प्रास्ताविक अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी केले. सहायक आयुक्त अण्णा बोदडे यांनी सूत्रसंचालन केले, तर नगरसदस्य नामदेव ढाके यांनी आभार मानले.
मूर्तीचे विर्सजन नदीमध्ये करतात, तर काही जण हौदामध्ये करतात. काहींची हौदांची संख्या वाढविण्याबाबत मागणी आहे. याकरिता सर्वांची पुन्हा एकदा बैठक घेऊन त्यावर चर्चा करून त्या बाबतीत निर्णय घेण्यात येईल, असे सांगून महानगरपालिकेच्या माध्यमातून आवश्यक तेवढ्या सुविधा गणेशोत्सवात पुरविल्या जातील.
- राहुल जाधव, महापौर
बैठकीत सर्वांनी केलेल्या सूचना विचारात घेऊन विसर्जनस्थळी सुरक्षारक्षक वाढविणेत येतील. गणेशोत्सवात शांतता नांदली पाहिजे. पर्यावरण राखता आले पाहिजे, असे सांगून विसर्जनानंतर चांगले कामकाज करणाऱ्या संस्था, मंडळांना गौरविण्यात येईल.
- एकनाथ पवार, पक्षनेते