‘एसटी’ची वेल्ह्याकडे पाठ
By admin | Published: August 31, 2015 03:48 AM2015-08-31T03:48:36+5:302015-08-31T03:48:36+5:30
वेल्हे तालुक्यातील डोंगरी भागात एसटी महामंडळाच्या अपुऱ्या बसफेऱ्यांमुळे येथील प्रवाशांना तासन्तास ताटकळत बसण्याची वेळ आली आहे. अनेक गाड्या रद्द करण्यात आल्याने
मार्गासनी : वेल्हे तालुक्यातील डोंगरी भागात एसटी महामंडळाच्या अपुऱ्या बसफेऱ्यांमुळे येथील प्रवाशांना तासन्तास ताटकळत बसण्याची वेळ आली आहे. अनेक गाड्या रद्द करण्यात आल्याने दुर्गम भागातील गावात नागरिकांना जाण्यास खोळंबा होत आहे.
पुण्यापासून अवघ्या पन्नास किलोमीटरवर असलेल्या वेल्हे तालुक्याकडे एसटी महामंडळाने पाठ फिरवली आहे. या तालुक्यातील दुर्गम भागात जाणाऱ्या गाड्या महामंडळाने बंद केल्या आहेत. बसफेऱ्यांची संख्याही कमी असल्याने प्रवाशांना तासन्तास ताटकळत बसावे लागते. दुपारी चार वाजता वेल्हे येथून सुटणारी बस निघून गेल्यावर पुन्हा दुसऱ्याच दिवशी बस असते. त्यामुळे यांचा फटका येथील शासकीय कर्मचारी व वेल्हे येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना बसत आहे. यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
तोरणा व मढेघाट पाहण्यासाठी पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. राजगड पायथ्याशी असलेले गुंजवणे येथे दुपारी साडेतीन वाजता पोहोचणारी गाडी चार वाजताच परत फिरते. या बसचा काहीही उपयोग होत नाही. साखर येथील हायस्कूल साडेचार वाजता सुटते. यामुळे येथील विद्यार्थ्यांना चालतच घर गाठावे लागते. जर ती बस स्वारगेटवरून दुपारी तीन वाजता सोडली तर ती शाळेच्या वेळेत साखर येथे आणि पर्यटकांच्या वेळेत गुंजवणे येथे पोहोचेल. स्वारगेटवरून रात्री मुक्कामाची शेवटची गाडीची सेवा अनियमित असते. शनिवारी आणि रविवारी ही गाडी बंदच असते. याबाबत तक्रार केल्यास स्वारगेट आगारप्रमुखांकडून प्रवाशांना उडवाउडवीची उत्तरे मिळतात. पुणे ते वेल्हे दररोज प्रवास करणारे चाकरमानकर जास्त आहेत. रात्री परत वेल्ह्याकडे येत असताना शनिवारी व रविवारी गाडीच नसते. आगार व्यवस्थापक याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहेत. भोर आगाराहून वेल्ह्याकडे सुटणाऱ्या गाड्यादेखील भोर आगाराने बंद केलेल्या आहेत. भोर आगाराहून स्वारगेटला जाणारी आणि तेथून निवी या ठिकाणी मुक्कामी असणारी गाडी गेल्या तीन महिन्यांपासून बंदच आहे.
महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्राच्या यात्रा सुरू झाल्यानंतर वेल्ह्यातील बहुतेक सर्वच गाड्या बंद केल्या जातात. त्यामुळे नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांची ताराबळ उडते आणि नसरापूर, शिरवळ, कापूरव्होळ, शिवापूर, वेळू परिसरात वेल्ह्यातील कामगार काम करीत आहेत. नसरापूरमध्ये नियमित साडेआठ वाजता गाडी येत असते. रविवारी नसरापूरचा बाजार असतो. त्यामुळे शेवटच्या गाडीला गर्दी असते. पण शनिवारी व रविवारी सायंकाळी परत वेल्ह्यास जाण्यासाठी या शेवटच्या गाडीवर ते अवंलबून असतात. नसरापूर येथे शेवटची गाडी तरी शनिवारी आणि रविवारीदेखील शेवटची गाडी सोडावी, तसेच पानशेत येथील नागरिकांना शासकीय कामासाठी वेल्हे येथे येण्यासाठी कोणतीही सोय नाही.