धन्य दिन संतदर्शनाचा, अनंत जन्मीचा शीण गेला...!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 10:27 AM2024-12-02T10:27:14+5:302024-12-02T10:27:34+5:30

भाविकांच्या गर्दीने गजबजलेली अलंकापुरी काही तासांतच सुनी सुनी झाली.

The blessed day of Saint Darshan, the dew of eternal birth is gone | धन्य दिन संतदर्शनाचा, अनंत जन्मीचा शीण गेला...!

धन्य दिन संतदर्शनाचा, अनंत जन्मीचा शीण गेला...!

आळंदी: ज्ञानियांचा राजा संतश्रेष्ठ श्री ज्ञानोबारायांच्या ७२८ व्या संजीवन समाधी दिन सोहळ्याची छबिना व 'श्रीं'ची पालखीतून नगरप्रदक्षिणा मिरवणूक काढून मोठ्या उत्साहात सांगता करण्यात आली. 'ज्ञानोबा माउली तुकाराम' असा जयघोष करत हजारो माउली भक्त नगरप्रदक्षिणा मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. त्यानंतर भाविकांच्या गर्दीने गजबजलेली अलंकापुरी काही तासांतच सुनी सुनी झाली.

धन्य आज दिन संत दर्शनाचा । अनंत जन्मीचा शीण गेला ॥ मज वाटे त्यांशी आलिंगन द्यावे। कदा न सोडावे चरण त्यांचे ॥

गेल्या आठ दिवसांपासून अलंकापुरीत माउलींचा संजीवन सोहळा भक्तिमय वातावरणात सुरु होता. राज्याच्या कानाकोपऱ्यातून माउलींचा संजीवन सोहळा तसेच कार्तिकी वारी प्रत्यक्ष स्वतःच्या नयनांनी अनुभवण्यासाठी सुमारे तीन ते साडेतीन लाख भाविकांची मांदियाळी अलंकापुरीत दाखल झाली होती. गुरुवारी (दि. २८) माउलींचा संजीवन समाधी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

तत्पूर्वी  आज पहाटे तीनच्या सुमारास माउलींची आरती, महापूजा करण्यात आली. दुधारती घेऊन आजच्या सांगता दिवसाला प्रारंभ करण्यात आला. दर्शनबारीतून भाविकांना 'श्रीं'च्या दर्शनासाठी सोडण्यात आले. दुपारी बाराच्या दरम्यान माउलींना महानैवेद्य दाखविण्यात आला. रात्री आठ वाजता धूपारती घेऊन शेजारती घेऊन आठदिवसीय सोहळ्याची विधिवत सांगता करण्यात आली. सोहळा सांगतेच्या मुख्य कार्यक्रमाला साडेनऊच्या सुमारास सुरुवात करण्यात आली. 'श्रीं'ची विधिवत महापूजा करून मानकऱ्यांच्या साह्याने "पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम... पंढरीनाथ महाराज की जय" असा जयघोष करून माउलींना पंखा मंडपातून, करंज्या मंडप, वीणा मंडपात घेऊन आणण्यात आले.

मंदिराच्या मुख्य महाद्वारातून श्रींचा छबिना सजविलेल्या पालखीतून नगरप्रदक्षिणेसाठी मार्गस्थ झाला. त्यावेळी पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

शनिमंदिरापासून फुलवाले धर्मशाळा, चाकण चौक, भैराबा चौकमार्गे निघालेला हा छबिना हजेरी मारुतीजवळ येऊन काही वेळापुरता विसावला. विसावा घेऊन पुन्हा सोहळा पुढे मार्गस्थ झाला. नगरपरिषद चौकमार्गे आजोळ घरासमोरून विष्णू मंदिराशेजारून इंद्रायणी घाटाकडून रात्री साडेबाराच्या सुमारास पालखी सोहळा मंदिराच्या महाद्वाराजवळ पोहचला. वीणामंडपात आरती घेऊन माउलींच्या पादुकांना शेजघरामध्ये स्थापन करून सोहळ्याची विधिवत सांगता करण्यात आली.

दर्शनासाठी गर्दी
मंदिराच्या मुख्य महाद्वारातून श्रींचा छबिना सजविलेल्या पालखीतून नगरप्रदक्षिणेसाठी मार्गस्थ झाला. त्यावेळी पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.  

Web Title: The blessed day of Saint Darshan, the dew of eternal birth is gone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.