सफाई कामगाराचा मृतदेह ठेवला महापालिकेच्या गेटवर; मृताच्या नातेवाईकांसह आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 02:08 PM2022-03-10T14:08:52+5:302022-03-10T14:09:02+5:30

कामगार प्रमाणपत्रासाठी धावपळ करत असताना चक्कर येऊन हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला होता

The body of a cleaner was placed at the municipal gate Charges filed against protesters including relatives of the deceased | सफाई कामगाराचा मृतदेह ठेवला महापालिकेच्या गेटवर; मृताच्या नातेवाईकांसह आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल

सफाई कामगाराचा मृतदेह ठेवला महापालिकेच्या गेटवर; मृताच्या नातेवाईकांसह आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल

Next

पिंपरी : महापालिकेच्या मुख्य गेटवर सफाई कामगाराचा मृतदेह ठेवून आंदोलन केले. ही घटना मंगळवारी (दि. ८) रात्री पावणे आठ ते पावणेदहा या कालावधीत पिंपरी - चिंचवड महापालिका मुख्यालयाच्या पिंपरी येथील प्रशासकीय इमारतीच्या मुख्य प्रवेशव्दाराजवळ घडली. याप्रकरणी मृताच्या नातेवाईकांसह आंदोलन करणाऱ्या नऊ जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

हिरामण पिंटू यादव (वय ५७, रा. हिराबाई झोपडपट्टी, कासारवाडी), असे मृत्यू झालेल्या सफाई कामगाराचे नाव आहे. महापालिकेचे सुरक्षा पर्यवेक्षक दुंदाजी तारडे यांनी याप्रकरणी बुधवारी (दि. ९) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मयत हिरामण यांचा मुलगा आशिष हिरामण यादव, मुलगी रेणुका महादेव शिंदे, दुसरी मुलगी अरुणा राजू भालेराव, बाबा कांबळे, बळीराम काकडे, नीलेश हाके, संतोष निसर्गंध, सदाशिव तळेकर, मधुरा डांगे आणि त्यांचे इतर साथीदार यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड महापालिका ग प्रभाग अंतर्गत तिरुपती इंटरप्राईजेस या ठेकेदार कंपनीकडे साफसफाई करणाऱ्या महिलांचा ठेकेदार कंपनीने तीन ते चार महिन्यांपासून पगार दिला नाही. या कारणावरून ७ मार्चला दुपारी तीनपासून सफाई कामगार महिला आंदोलन करीत होत्या. शुभम उद्योगच्या अंतर्गत कामास असलेले सफाई कामगार हिरामण पिंटू यादव यांचा मंगळवारी (दि. ८) हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. हिरामण यादव यांना फिटनेस प्रमाणपत्र आणल्याशिवाय कामावर घेणार नाही, असे सांगितल्याने व प्रमाणपत्रासाठी धावपळ करत असताना चक्कर येऊन हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला आहे, असे म्हणून त्यांचा मृतदेह रुग्णवाहिकेत घालून त्यांच्या नातेवाईकांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या गेटवर आणून ठेवला. मुलगा आशिष आणि मुलगी आशा यांना महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी मिळावी, अशी मागणी करून ठेकेदार व सुपरवायझर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक होईपर्यंत मृतदेह हलविणार नाही, असा आग्रह करून आंदोलन करण्यात आले.

सहाय्यक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच इतर पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलकांना समजावून सांगून देखील सुमारे दोन तास हिरामण यांचा मृतदेह आंदोलनाच्या ठिकाणी ठेवून त्यांच्यावर विधीवत अंत्यसंस्कार न करता मानवी शवाची अप्रतिष्ठा केली, असे फिर्यादीत नमूद आहे.

Web Title: The body of a cleaner was placed at the municipal gate Charges filed against protesters including relatives of the deceased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.