सावधान! मुलांनी ‘रिल्स’ केले; पालकांनो, तुम्ही पाहिले का?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2022 10:39 AM2022-11-11T10:39:47+5:302022-11-11T10:42:06+5:30
सध्या निगेटिव्ह फेम जास्त हायलाइट होतो. त्यामुळे किशोरवयीन मुले जास्त ‘इन्फ्ल्यूएन्स’ होतात...
- नारायण बडगुजर
पिंपरी : व्यक्त होण्यासाठी भाषा, शब्द याची मर्यादा राहात नाही. सध्या तर वयाची बंधनेही नाहीत. त्यात ‘सोशल मीडिया’चा मुक्त प्लॅटफाॅर्म उपलब्ध होत आहे. त्यावर सुसाट सुटलेल्या अल्पवयीन मुले व तरुणांकडून चुकीचा मार्ग अवलंबला जात आहे. इन्स्ट्राग्राम, व्हाटसअप, युट्यूब, फेसबुक अशा विविध ‘ॲप्स’वर रिल्स, शाॅर्ट स्टोरी, स्टेटस ठेवण्याचे ‘फॅड’ आहे. मात्र, सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असलेल्या अनेक मुलांकडून त्यांच्या पालकांना ‘ब्लाॅक’ केले जाते. त्यामुळे मुलांनी केलेले ‘रिल्स’ पालकांना पाहता येत नाहीत.
कोरोना काळानंतर मुलांच्या हातात मोबाइल आला. त्यानंतर ते ऑनलाइन झाले. परिणामी अद्ययावत तंत्रज्ञानाबाबत मुले पालकांपेक्षा जास्त सजग झाल्याचे दिसून येेते. त्यामुळे ‘सोशल मीडिया’त मुलांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे पालकांना सहज शक्य होत नाही. मुलांना चांगले शिक्षण आणि संस्कार देण्यासाठी पालकांची धडपड असते. मात्र, घरात अदबीने राहणारी मुले सोशल मीडियावर कशी वावरतात याबाबत पालकांना माहिती असतेच असे नाही.
मिसरुड फुटले अन्
नुकतेच मिसरुड फुटलेली काही मुले तसेच तरुणांकडून लाईक्स, शेअर, फाॅलोअर्स वाढविण्याच्या नादात एकमेकांना खुन्नस देणारे स्टेटस, रिल्सचे व्हिडिओ तयार केले जातात. प्रेम, सूडभावना तसेच पैसे मिळविण्याच्या नादात असे प्रकार केले जातात. याचे पर्यावसन गुन्हेगारी कृत्यांमध्ये होते.
टोळीमध्ये स्टेटस वाॅर अन् तरुणाचा खून
तळेगाव दाभाडे येथे दोन टोळ्यांमध्ये सोशल मीडियावर स्टेटस वाॅर छेडले. व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर भाईगिरी करण्यात आली. हा वाद इतका टोकला गेला की, यातून एका तरुणाचा निर्घृण खून झाला.
निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलावर गुन्हा दाखल
प्रेमसंबंध पुढे सुरू ठेवण्यास नकार दिल्याने तरुणीचे न्यूड फोटो, अश्लील व्हिडिओ पाॅर्नोग्राफीक वेबसाईटवर अपलोड केले. निवृत्त सहायक पोलीस आयुक्ताच्या मुलावर याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. मुले सोशल मीडियाचा गैरवापर करीत आहेत का, याबाबत पालकांनी सजग राहिले पाहिजे, असे यावरून दिसून येते.
मुलांनी ‘रिल्स’ केले; पालकांनो, तुम्ही पाहिले का?
आमचा मुलगा किती हुशार? इन्स्टाग्रामवर अकाउंट सुरू करण्यासाठी किमान १४ वर्षे वयाची अट आहे. मात्र, पालकांमध्येच रिल्सची स्पर्धा आणि क्रेझ आहे. त्यामुळे असे पालक त्यांच्या शिशू अवस्थेतील मुलांचेही अकाउंट सुरू करतात. आमचा मुलगा किंवा मुलगी किती हुशार किंवा गुणी आहे, असे दाखवण्याचा या पालकांचा प्रयत्न असतो. यातून वयाची १४ वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच संबंधित मुलगा सोशल मीडियात ॲक्टिव्ह होतो. अशा मुलांच्या प्रत्येक रिल्स किंवा व्हिडिओवर पालकांचा ‘वाॅच’ राहणे शक्य होत नाही.
किशोरवयीन होतात ‘इन्फ्ल्यूएन्स’
सोशल मीडियावर त्यातही इन्स्टाग्रामवर १६ ते २० या वयोगटातील मुले जास्त ॲक्टि्व्ह आहेत. त्यांना निगेटिव्ह फेम आणि पाॅझिटिव्ह फेम याबाबत परिपूर्ण माहिती नसते. सध्या निगेटिव्ह फेम जास्त हायलाइट होतो. त्यामुळे किशोरवयीन मुले जास्त ‘इन्फ्ल्यूएन्स’ होतात. मात्र, अनेकांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून नवीन ‘क्लाएंट’ जोडण्यासह व्यवसायवृद्धी केली जाते.
लाइक्सवरून लायकी ठरते का?
आपले फाॅलोअर्स वाढले पाहिजेत, असे प्रत्येकाला वाटते. सोशल मीडियावरल फाॅलोअर्स वाढले तर नातेवाईक, मित्र, तसेच समाजात आपली प्रतिष्ठा वाढेल, असा काही जणांचा समज असतो. त्यामुळे रिल्स, स्टेटस, व्हिडिओला शेअर, लाईक्स मिळविण्यासाठी त्यांचा खटाटोप सुरू असतो. मात्र, लाइक्सवरून आपली लायकी ठरते का, हा प्रश्न त्यांनी स्वत:ला विचारला पाहिजे. तसेच पालकांनीही त्याबाबत मुलांना पटवून दिले पाहिजे.
‘हे’ किड्स फसवू शकतात
सध्या १६ ते २० वयोगटातील मुले पालकांना तंत्रज्ञानाबाबत फसवू शकतात. मात्र, सध्याची ही मुले स्व:त तंत्रस्नेही असल्याने त्यांच्या पुढची पिढी त्यांना फसवू शकणार नाही. असे असले तरी सोशल मीडियावर शेअर केलेल व्हिडिओ, फोटो याबाबत आज ना उद्या पालकांना माहिती होणारच आहे. त्यामुळे मुलांनी पालकांपासून कोणतीही बाब लपवू नये.
- योगेश शिंदे, थेरगाव, फिल्ममेकर, फोटोग्राफी
पालकांनी मुलांना वेळ द्यावा
मुले नेमके काय शेअर करतात, तसेच त्यांच्या आवडी-निवडी पालकांनी ‘आयडेन्टीफाय’ केले पाहिजे. पर्सनल लाइफ आणि प्रोफेशनल लाइफ यातील फरक मुलांना समजावून सांगितला पाहिजे. मुलांना मोबाईल दिला तरी पालकांनी वेळही द्यावा. गोष्टी, कथा, पुस्तक वाचन यासाठी मुलांना प्रोत्साहित करावे.
- स्वप्ना गोरे, पाेलीस उपायुक्त, पिंपरी-चिंचवड
मुलांना समजून घेऊन सजग करावे
माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर अभिप्रेत आहे. मात्र, अनेकांकडून अनावश्यक माहिती, फोटो, व्हिडिओ शेअर केले जातात. यात मुलांसाठी नको असलेले बरेच काही असते. त्यामुळे मुलांनी सोशल मीडियावरून नेमके काय घ्यावे, काय टाळावे, काय करावे, काय करू नये याबाबत पालकांनी समजावून सांगितले पाहिजे. तसेच मुलांची उत्सुकता, उत्कंठा समजून घेतली पाहिजे.
- डाॅ. राणी खेडीकर, बालसमुपदेशक, वाकड