आयुक्तांनी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले नाही; पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांना आमदार लांडगेंचे खडे बोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2024 13:45 IST2024-03-10T13:45:40+5:302024-03-10T13:45:48+5:30
सगळी कामे प्रशासन एकटेच करत नाही, प्रशासनाने सगळी कामे केली असती तर ही कामे दहा वर्षांपूर्वीच झाली असती

आयुक्तांनी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले नाही; पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांना आमदार लांडगेंचे खडे बोल
पिंपरी : महापालिकेमध्ये प्रशासक राजवट सुरू आहे. त्यामध्ये आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह लोकप्रतिनिधींना विश्वासात घेत नसल्याची तक्रार माजी नगरसेवक वारंवार करत आहे. त्यामध्येच शनिवारी (दि.९) भोसरी मतदारसंघातील विविध विकासप्रकल्पांच्या कामाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी आयुक्त शेखर सिंह यांनी नगरसेवक तसेच प्रकल्पासाठी जमिनी दिलेल्या भूमिपुत्रांचे नाव प्रास्ताविकात घेतले नाही. त्यामुळे आमदार महेश लांडगे यांनी आयुक्त सिंह यांना चांगलेच खडे बोल सुनावले.
विकासकामांच्या लोकार्पण व भूमिपूजन सोहळ्यावेळी आयुक्त सिंह यांनी प्रास्ताविक केले. त्यामध्ये त्यांनी विकासकामांचा खर्च, कामाची आवश्यकता याबाबत माहिती विषद केली. मात्र, ज्या नागरिकांनी विकासकामांसाठी जमिनी दिल्या. तसेच ज्या नगरसेवकांनी कामे सुचवली त्यांची नावे घेतली नाही. त्यामुळे चिडलेल्या आमदार महेश लांडगे यांनी आयुक्त सिंह यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच समाचार घेतला.
लांडगे म्हणाले, सगळी कामे प्रशासन एकटेच करत नाही. प्रशासनाने सगळी कामे केली असती तर ही कामे दहा वर्षांपूर्वीच झाली असती. सन १९९७ ला ही गावे महापालिकेत समाविष्ठ झाली त्यापूर्वी या गावांचा विकास का झाला नाही. सन २०१७ नंतर हे नगरसेवक निवडून आले त्यांनी आपल्या परिसरात विविध कामे सुचवली. त्या कामांसाठी त्यांची सातत्याने पाठपुरावा केला. तसेच हे प्रकल्प उभे राहण्यासाठी येथील भूमिपुत्रांनी आपल्या जमिनी दिल्या. म्हणून हे प्रकल्प आज उभे राहिले आहेत. मात्र, प्रशासकांनी त्यांचा साधा नामोल्लेख ही न करणे हे चांगले नाही, असे म्हणत आयुक्त सिंह यांच्यावर आगपाखड केली.