Pune Crime| महावितरणच्या अभियंत्याने मागितली ५० हजारांची लाच
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 12:41 PM2022-08-25T12:41:43+5:302022-08-25T12:45:01+5:30
७९ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती...
पिंपरी :महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्याने एका कंपनीतील वीज मीटर कनेक्शन बंद करण्यासाठी ५० हजारांची लाच मागितली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पडताळणी करून कनिष्ठ अभियंत्यावर कारवाई केली.
संतोषकुमार बाळासाहेब गित्ते (वय ३१) असे ताब्यात घेतलेल्या कनिष्ठ अभियंत्याचे नाव आहे. याप्रकरणी ७९ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची एमआयडीसी भोसरी परिसरात कंपनी आहे. त्या कंपनीतील विद्युत मीटरचे वीज कनेक्शन बंद करण्यासाठी त्यांनी महावितरणच्या भोसरी उपविभाग एक या कार्यालयात अर्ज दिला.
आरोपी हे या कार्यालयात कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदार यांच्या कंपनीतील वीज कनेक्शन बंद करण्यासाठी आरोपीने ५० हजारांची लाच मागितली. याबाबत तक्रारदार यांनी ‘एसीबी’कडे तक्रार केली. एसीबीने १२, १३ आणि १७ ऑगस्ट रोजी पडताळणी करून कारवाई केली. त्यात कनिष्ठ अभियंता गित्ते यांना ‘एसीबी’ने ताब्यात घेतले. याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पुणे युनिटचे पोलीस निरीक्षक वीरनाथ माने तपास करीत आहेत.